सुटय़ांचा मोसम, उत्सवी वातावरण या पाश्र्वभूमीवर मुंबईकर प्रवासासाठी घराबाहेर निघत असताना त्यांच्या प्रवासात विघ्न म्हणून उभ्या राहणाऱ्या तिकीट दलालांविरोधात मध्य रेल्वेने कंबर कसली आहे. मध्य रेल्वेच्या तिकीट दलालविरोधी पथकाने शुक्रवारी विरार येथे कारवाई करीत दोघांना अटक केली. या दोघांकडून १० संगणक, ८ पेन ड्राइव्ह यांच्यासह ९११ तिकिटे हस्तगत करण्यात आली. या तिकिटांची किंमत ४२ लाख रुपये असून एवढय़ा मोठय़ा प्रमाणात चाललेली ही दलाली पाहून तिकीट दलालविरोधी पथकातील अधिकाऱ्यांचे डोळेही पांढरे झाले.
लांबपल्ल्याच्या गाडय़ांची तिकिटे आरक्षण सुरू झाल्यानंतर काही तासांतच संपतात. परिणामी अनेकांना तिकिटे मिळत नाहीत. मात्र ऑनलाइन आरक्षण सेवेचा गैरफायदा घेत एकापेक्षा जास्त तिकिटे आरक्षित करणारे दलाल ही तिकिटे जास्त दरात प्रवाशांना विकत असल्याच्या तक्रारी रेल्वेकडे आल्या होत्या. या गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी मध्य रेल्वेने तिकीट दलालविरोधी पथक स्थापन केले आहे.
या पथकाला मिळालेल्या माहितीनुसार या पथकाने विरार येथे कारवाई केली. या कारवाईत कल्पेश शहा आणि संदीप पारेख या दोघांना ताब्यात घेऊन आरपीएफच्या हवाली करण्यात आले. या दोघांनी १० संगणकांवर बनावट सॉफ्टवेअर टाकले होते. या दोघांनी तब्बल १४००हून अधिक खासगी आयडी आणि ६०० इंटरनेट प्रोटोकॉल्स उघडले होते.
या बनावट आयपी अ‍ॅड्रेसच्या आधारे ते एकाच वेळी २५ ते १३६ तिकिटे काढत असत. या दोघांकडून पथकाने ९११ तिकिटे हस्तगत केली. या तिकिटांची किंमत ४२ लाख २६ हजार २५५ रुपये एवढी आहे. मध्य रेल्वेच्या या तिकीट दलालविरोधी पथकाचे हे मोठे यश मानले जात आहे. दिवाळी आणि त्यानंतर नाताळ सुटय़ांच्या मोसमात हे पथक अशाच धडक कारवाया करणार आहे.