News Flash

व्यवसाय सुलभतेच्या ४२ टक्के सुधारणा कागदावरच

कृती आराखडा तयार करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

(संग्रहित छायाचित्र)

संपूर्ण देशात महाराष्ट्र सर्व गुंतवणूकदारांसाठी पहिल्या पसंतीचे राज्य असले तरी उद्योगांशी निगडित ४२.८६ टक्के सुधारणा कागदावरच राहिल्याचे स्पष्ट झाले आहे. याची गंभीर दखल घेत व्यवसाय सुलभतेची प्रक्रिया प्रभावी करण्यासाठी कृती आराखडा तयार करण्याचा आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उद्योग विभागाला दिला.

व्यवसाय सुलभतेच्या राष्ट्रीय यादीत महाराष्ट्र काही वर्षांपासून मागे पडत असून याही वर्षी तो १३व्या स्थानावरच आहे. उत्तर प्रदेश, तेलंगणासारखी राज्ये व्यवसाय सुलभतेच्या बाबतीत महाराष्ट्राच्या पुढे गेली आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर आढावा बैठक घेतली.

महाराष्ट्र सर्वात जास्त परकीय गुंतवणूक मिळविणारे राज्य आहे. गुंतवणुकीचा हा ओघ असाच वाढता राहायला हवा. राज्याच्या भरभराटीसाठी अधिकाधिक गुंतवणूकदार यायला हवेत. त्यासाठी व्यवसाय सुलभतेची प्रभावी अंमलबजावणी करायला हवी. म्हणून अंमलबजावणीसाठी आवश्यक पावले उचलावीत, अशा सूचना त्यांनी दिल्या. तसेच अशा प्रयत्नांमुळेच भविष्यात उद्योगक्षेत्रात राज्याची कामगिरी इतरांसाठी दिशादर्शक ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

या आढावा बैठकीला राज्याचे मुख्य सचिव संजयकुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, महसूल विभागाचे अप्पर मुख्य सचिव नितीन करीर, मुख्यमंत्र्यांचे अप्पर मुख्य सचिव आशीषकुमार सिंह, मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, उद्योग विभागाचे प्रधान सचिव गोपाल रेड्डी, प्रधान सचिव विकास आयुक्त हर्षदीप कांबळे उपस्थित होते. या वेळी उद्योग विभागाकडून सादरीकरण करण्यात आले.

बैठकीत काय झाले? : व्यवसाय सुलभतेच्या बाबतीत राज्यातील १६ खात्यांच्या २९ उपविभागांकडे अनेक प्रशासकीय सुधारणा सुचवण्यात आल्या होत्या. त्यापैकी ४२ टक्के  सुधारणांची अंमलबजावणी झाली १४ टक्के सुधारणा काही प्रमाणात अमलात येत आहेत, तर ४२.८६ टक्के सुधारणा कागदावरच राहिल्याची बाब या आढावा बैठकीत स्पष्ट झाली. केंद्रीय व्यवस्था उभारणे, जिल्हा पातळीवरील यंत्रणेत आणखी सुधारणा करणे अशा विविध गोष्टींवर बैठकीत चर्चा झाली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 18, 2020 12:22 am

Web Title: 42 percent business facilitation improvement on paper only abn 97
Next Stories
1 राज्यात जमावबंदी कायम मुदत ३० सप्टेंबपर्यंत वाढवली
2 सेवाव्रतींना आश्वासक दाद
3 आजपासून जोरदार पावसाचा अंदाज
Just Now!
X