भाजपला तीन जागा मिळणार

राज्यसभेच्या सहा जागांसाठी पुढील महिन्यात होणाऱ्या निवडणुकीत पहिल्या फेरीतील विजयाकरिता ४२ मते आवश्यक ठरणार आहेत. विधानसभेतील मतांचे एकूण संख्याबळ लक्षात घेता सत्ताधारी भाजपला तीन जागा मिळणार आहेत.

मतदान कशा प्रकारे होते ?

मतदान हे खुल्या पद्धतीने होते. यानुसार राजकीय पक्षांच्या आमदारांना पक्षाने नियुक्त केलेल्या प्रतिनिधींना आपली मतपत्रिका दाखवावी लागते. अपक्षांना मतपत्रिका दाखविण्याचे बंधन नसते. राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींऐवजी अन्य कोणाला मतपत्रिका दाखविल्यास मत बाद होते. अलीकडेच गुजरातमध्ये झालेल्या राज्यसभा निवडणुकीत दोन आमदारांनी मतपत्रिका अधिकृत प्रतिनिधींेऐवजी अन्य प्रतिनिधींना दाखविल्याने त्या दोन मतपत्रिका निवडणूक आयोगाने बाद ठरविल्या होत्या. खुल्या पद्धतीने मतदान होत असल्याने मते फुटण्यास वाव नसतो. कारण राजकीय पक्षांनी जारी केलेल्या पक्षादेशाच्या विरोधात मतदान केल्यास संबंधित आमदाराचे सदस्यत्व रद्द होऊ शकते.

संख्याबळानुसार कोणाचे किती उमेदवार निवडून येऊ शकतात ?

सहा जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत संख्याबळानुसार भाजपचे तीन, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा प्रत्येकी एक उमेदवार निवडून येऊ शकतो. भाजपचे १२२ आमदार असून, तिसरा उमेदवार निवडून येण्यात दहा मतांची आवश्यकता आहे. छोटे पक्ष आणि अपक्षांचा पाठिंबा असल्याने भाजपचे तीन उमेदवार सहजपणे निवडून येऊ शकतात. शिवसेनेकडे २१ मते अतिरिक्तअसली तरी आणखी २१ मते मिळविणे शिवसेनेला शक्य नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे जेमतेम मते असल्याने या दोन्ही पक्षांकडे दुसऱ्या पसंतीची मते देण्यासाठी वाव नाही.

भाजपला फायदा कसा होणार ?

संख्याबळानुसार भाजपचे तीन उमेदवार निवडून येऊ शकतात. सध्या भाजपचा एकच खासदार आहे. यामुळे महाराष्ट्रातून भाजपला दोन खासदारांचा फायदाच होणार आहे. भाजपमध्ये अनेक जण इच्छुक असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शहा हे अंतिम निर्णय घेतील.

शिवसेनेत अनिल देसाई यांनाच पुन्हा खासदारकी

शिवसेनेत विद्यमान खासदार अनिल देसाई यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. देसाई हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय आहेत. याशिवाय पक्षाचा दिल्लीतील चेहरा म्हणून ते वावरतात.

राष्ट्रवादीची वंदना चव्हाण यांनाच फेरउमेदवारी

वंदना चव्हाण आणि डी. पी. त्रिपाठी या दोन खासदारांची मुदत संपुष्टात येत आहे. संख्याबळानुसार पक्षाचा एकच उमेदवार निवडून येऊ शकतो. वंदना चव्हाण यांना पक्षाने पुन्हा संधी दिली आहे.

काँग्रेसमध्ये कोणाला पसंती मिळणार?

काँग्रेसच्या रजनी पाटील आणि राजीव शुक्ला हे दोघे निवृत्त होत आहेत. यापैकी शुक्ला हे राज्याबाहेरील असून, आतापर्यंत दोनदा ते राज्यातून राज्यसभेवर निवडून गेले आहेत.

रजनी पाटील या दुसऱ्यांदा संधी मिळावी म्हणून इच्छुक आहेत. सुशीलकुमार शिंदे, मुकूल वासनिक हे पक्षाचे ज्येष्ठ सरचिटणीस यांचीही नावे चर्चेत आहेत. गेल्या वेळी पी. चिदम्बरम या राज्याबाहेरील नेत्याला संधी देण्यात आली होती. यामुळे यंदा राज्यातील नेत्याचा विचार होऊ शकतो. पक्षाची राज्यसभेतील गरज लक्षात घेऊन उमेदवारी दिली जाऊ शकते.

शिवसेनेला अतिरिक्त मतांचा फायदा नाही!

सहा जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत संख्याबळानुसार भाजपचे तीन, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा प्रत्येकी एक उमेदवार निवडून येऊ शकतो. भाजपचे १२२ आमदार असून, तिसरा उमेदवार निवडून येण्यात दहा मतांची आवश्यकता आहे. छोटे पक्ष आणि अपक्षांचा पाठिंबा असल्याने भाजपचे तीन उमेदवार सहजपणे निवडून येऊ शकतात. शिवसेनेकडे २१ मते अतिरिक्तअसली तरी आणखी २१ मते मिळविणे शिवसेनेला शक्य नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे जेमतेम मते असल्याने या दोन्ही पक्षांकडे दुसऱ्या पसंतीची मते देण्यासाठी वाव नाही. परिणामी शिवसेनेकडे अतिरिक्त मते असली तरी या मतांचा फायदा होणार नाही.

मतांचा कोटा कसा ठरतो?

विधानसभेच्या सर्व २८८ सदस्यांना मतदानाचा अधिकार असतो. नामनियुक्त सदस्यांना मतदानाचा अधिकार नसतो. मतांचा कोटा खालीलप्रमाणे निश्चित केला जातो.

  • एकूण मतदार : २८८
  • एकूण जागा : ६
  • २८८ भागिले एकूण जागा सहा अधिक एक = २८८ भागिले सात = ४१.१४
  • यानुसार पहिल्या फेरीतील विजयाकरिता ४११४ मते आवश्यक ठरतात.

निवृत्त होणारे सहा खासदार कोण ?

  • रजनी पाटील आणि राजीव शुक्ला (काँग्रेस)
  • वंदना चव्हाण व डी. पी. त्रिपाठी (राष्ट्रवादी)
  • अनिल देसाई (शिवसेना)
  • अजय संचेती (भाजप)