जामनगर ते मुंबई रेल्वेने वाहतूक;  नागपूर, पुण्यासाठीही पुरवठा

मुंबई : गुजरातमधून महाराष्ट्राला ४४ टन लिक्विड प्राणवायूचा पुरवठा होणार आहे. हा प्राणवायू तीन टँकरमधून रेल्वेच्या रो रो सेवेने सोमवारी कळंबोली येथे दाखल होणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वेने दिली. यापाठोपाठ रेल्वे मंत्रालयाने महाराष्ट्रासाठी प्राणवायूची वाहतूक करण्याचे नियोजनही के ले आहे. यात जामनगरमधून मुंबईसाठी आणि अंगुलमधून नागपूर, पुणेसाठी प्राणवायूची वाहतूक रो रो सेवेने के ली जाणार असल्याचे सांगितले.

करोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून राज्याला प्राणवायूची अधिक गरज भासत आहे. महाराष्ट्राला प्राणवायूची वाहतूक करण्यासाठी १८ एप्रिलला कळंबोली येथून सात टँकर रेल्वेच्या रो रो सेवेने विशाखापट्टणम येथे पाठवले होते. हे टँकर भरल्यानंतर ते नुकतेच प्रथम नागपूर आणि नंतर नाशिक येथे दाखल झाले. यातून १०० टनहून अधिक लिक्विड प्राणवायूची वाहतूक करण्यात आली होती. त्यापाठोपाठ आता पश्चिम रेल्वेकडूनही पहिली प्राणवायू एक्स्प्रेस गुजरातमधील हापा येथून रविवारी सायंकाळी ६ वाजता महाराष्ट्रासाठी सोडण्यात आली. तीन टँकरमधून ४४ टन प्राणवायू घेऊन ही रेल्वे सोमवारी सकाळी कळंबोलीला पोहोचेल. या प्राणवायू रेल्वेगाडीचा प्रवास विरामगम, अहमदाबाद, वडोदरा, सुरत आणि वसई रोड मार्गे होईल.

जामनगरमधील रिलायन्स इंडस्ट्रीकडून या प्राणवायूचा पुरवठा करण्यात आला आहे. यामुळे प्राणवायूची आणखी काही गरज भागणार आहे. भारतीय रेल्वेकडून रो रो सेवेमार्फत प्राणवायूची वाहतूक करण्यासाठी पुढाकार घेण्यात आला आहे. तसेच छत्तीसगढहून दिल्लीसाठीही ४ टँकरमधून ७० मेट्रिक टन, बोकारो येथून लखनऊसाठी पाच टँकरमधूनही प्राणवायूची वाहतूक  केली जाणार आहे.