घाटकोपरमध्ये संख्या सर्वाधिक ; बहुतांश इमारतींत अजूनही रहिवाशांचे वास्तव्य

इंद्रायणी नार्वेकर, लोकसत्ता

मुंबई : मुंबईतील अतिधोकादायक इमारतींची संख्या गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत कमी झाली आहे.  या वर्षी पालिकेने केलेल्या सर्वेक्षणात ४४३ इमारती अतिधोकादायक आढळल्या आहेत. गेल्या वर्षी धोकादायक इमारतींची संख्या ४९९ होती. यापैकी काही इमारती पाडून टाकण्यात पालिके ला यश आले आहे.  धोकादायक इमारतींमध्ये ५२ इमारती पालिकेच्या मालकीच्या असून सर्वाधिक धोकादायक इमारती घाटकोपर परिसरात आहेत.  न्यायालयीन खटले, रहिवाशांचे वाद यामुळे ४०० पेक्षा अधिक धोकादायक इमारती अशाच उभ्या आहेत व त्यात लोक जीव मुठीत घेऊन राहत आहेत.

दरवर्षी पावसाळ्याच्या तोंडावर पालिकेतर्फे मुंबईतील अत्यंत धोकादायक इमारतींची यादी जाहीर करण्यात येते. शहर व उपनगरातील सर्व खासगी व पालिकेच्या मालकीच्या इमारतींचे सर्वेक्षण केले जाते. त्यात ज्या इमारती तात्काळ पाडून टाकणे आवश्यक आहे अशा इमारती सी-वन या प्रकारात अर्थात अतिधोकादायक म्हणून गणल्या जातात. अशा अत्यंत धोकादायक ४४३ इमारती मुंबईत आहेत. दोन वर्षांपूर्वी तब्बल ६१९ अतिधोकादायक इमारती आढळून आल्या होत्या. गेल्या वर्षी ही संख्या ४९९ झाली होती. धोकादायक इमारतींपैकी काही इमारती पाडून टाकण्यात आल्या. काही इमारती रिकाम्या करण्यात आल्या आहेत. काही इमारतींवरील कारवाईला न्यायालयाने स्थगिती आदेश दिला आहे. त्यामुळे काही इमारतींची नावे गेल्या अनेक वर्षांपासून तशीच आहेत, अशी माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली.  इमारत धोकादायक आहे हे माहीत असले तरी एकदा घर सोडले की परत इमारत बांधून मिळेल की नाही, याच परिसरात मिळेल की नाही याची शाश्वती नसल्यामुळेही अनेक जण घरे सोडत नाहीत, हे वास्तव आहे. त्यामुळे दरवर्षी पावसाळ्याच्या तोंडावर पालिका रहिवाशांना नोटीस धाडते.

पालिकेच्या धोरणानुसार ३० वर्षे जुन्या इमारतींची संरचनात्मक तपासणी केली जाते. त्यात ज्या इमारती धोकादायक आढळतात, अशा इमारतींना घरे रिकामी करण्यासाठी ३५४ ची नोटीस बजावली जाते. त्यानुसार ही नोटीस बजावण्यात आली आहे. मात्र काही रहिवाशांचे वाद असतील तर न्यायालयात धाव घेतात  किंवा त्यांना इमारत धोकादायक वाटत नसेल तर ते पालिकेच्या तांत्रिक सल्लागार समितीकडे जातात. त्यामुळे त्या इमारती तशाच अवस्थेत राहतात. याबाबत अधिक माहिती देताना अधिकाऱ्यांनी सांगितले की, अशा इमारतीतील रहिवाशांकडून पालिका प्रतिज्ञापत्र लिहून घेते की, आम्ही आमच्या जबाबदारीवर राहत आहोत.

धोकादायक इमारतींच्या यादीत ए विभागातील बेस्टच्या मालकीची मेहेर मेन्शन, ताडदेव येथील गंगा जमुना चित्रपटगृह, लालबागचे गणेश टॉकीज, सायन येथील पंजाबी कॉलनीतील सर्व २५ इमारती अशा इमारतींचा गेल्या अनेक वर्षांपासून समावेश आहे. भायखळा, डोंगरी, गिरगाव या भागांत सर्वात जुन्या इमारती असल्या तरी त्या उपकर इमारती असल्यामुळे पालिकेच्या यादीत या भागातील खासगी धोकादायक इमारतींची संख्या सर्वात कमी आहे.

विभागवार धोकादायक इमारती

५२ एन विभागात (घाटकोपर)

५१ एच वेस्ट (वांद्रे पश्चिम)

४९ टी (मुलुंड)

३७ के/पश्चिम (अंधेरी व जोगेश्वरी पश्चिम)

३१ के पूर्व -अंधेरी व जोगेश्वरी पूर्व

२८ पी उत्तर – (मालाड)

२७ एच ईस्ट -(वांद्रे पूर्व)