मुंबई : बाधितांवर उपचार करण्यासाठी वर्ध्यातील महात्मा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयीतील ४५ निवासी डॉक्टर मंगळवारी मुंबईत दाखल झाले. याव्यतिरिक्त वैद्यकीय शिक्षण विभागाच्या(डीएमईआर) आदेशानंतर २३०० खासगी डॉक्टर काम करण्यासाठी पुढे आले आहेत.
जूनच्या पहिल्या आठडय़ापर्यत शहरातील रुग्णांची संख्या सुमारे ७५ हजारांवर पोचण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने करोना दक्षता केंद्र, आरोग्य केंद्रांमध्ये अधिकाधिक खाटा उभारण्याची तयारी पालिकेने केली असली तरी त्या तुलनेत डॉक्टरांचे मनुष्यबळ मात्र अपुरे आहे. त्यात खास करोना रुग्णालयांमध्ये तीव्र लक्षणे असलेल्या वा प्रकृती गंभीर असलेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टर अपुरे पडत असल्याने रुग्णालयांवरही ताण येत आहे. यादृष्टीने वर्धा येथील महात्मा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील ४५ डॉक्टरांची नियुक्ती डीएमईआरनेकेली आहे. मंगळवारी हे डॉक्टर मुंबईत दाखल झाले आहेत. बहुतांश विद्यार्थी हे औषधशास्त्र विभागातील तिसऱ्या वर्षांचे (परिक्षेसाठी सुट्टीवर गेलेले) तर पदविकाचे काही विद्यार्थी या चमूमध्ये आहेत. आज आमच्या परिक्षेचा पहिला पेपर होता. अशा रितीने मुंबईतील रुग्णांवर उपचारासाठी यावे लागेल असा विचारही मनात कधी आला नाही. रुग्णालयामध्ये आम्ही करोनाबाधित रुग्णांवर उपचार करत होतो. त्यामुळे कामाचा अनुभव हाताशी आहे. मात्र तीव्र लक्षणे किंवा प्रकृती गंभीर असलेल्या रुग्णांना कसे हाताळावे याबाबत लवकरच शिकून घेऊ असा विश्वास असल्याचे या डॉक्टरांनी व्यक्त केले.
२३०० डॉक्टर पालिके सोबत काम करण्यास इच्छुक
डीएमईआरच्या आदेशानुसार सुमारे १४ हजार डॉक्टरांनी माहिती नोंदविली आहे. यातील बहुतांश डॉक्टर विविध ठिकाणी कार्यरत असून २३०० डॉक्टरांनी पालिकेसोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यातील ७०० एमबीबीएस आहेत, तर १६०० तज्ज्ञ डॉक्टर आहेत. पालिकेला यांची यादी आम्ही दिलेली आहे. आवश्यकतेनुसार ते यांची नियुक्ती करतील, असे डीएमईआरचे संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी सांगितले. वर्ध्याव्यतिरिक्त अन्य शासकीय महाविद्यालयांमधून निवासी डॉक्टरांना बोलाविण्याचा विचार सध्यातरी केलेला नाही, असेही डॉ. लहाने म्हणाले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on May 13, 2020 2:40 am