25 September 2020

News Flash

४५ लाख तरुणांची मतदार नोंदणीकडे पाठ

मतदार याद्या पुनर्निरीक्षण मोहिमेच्या जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार तब्बल ४५ लाखांहून अधिक तरुणांनी नावनोंदणी प्रक्रियेपासून अलिप्त राहून एकप्रकारे निवडणूक प्रक्रियेकडेच पाठ फिरवली असल्याचे स्पष्ट झाले आहे.

| February 14, 2014 03:10 am

मतदार याद्या पुनर्निरीक्षण मोहिमेच्या जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार तब्बल ४५ लाखांहून अधिक तरुणांनी नावनोंदणी प्रक्रियेपासून अलिप्त राहून एकप्रकारे निवडणूक प्रक्रियेकडेच पाठ फिरवली असल्याचे स्पष्ट झाले आहे.   
२०११च्या जनगणनेनुसार राज्यात १८ ते १९ वयोगटातील लोकसंख्या ३८ लाख ९४ हजार ५८९ असली तरी त्यापैकी अवघ्या १० लाख ७५ हजार ३७६ जणांनी मतदार यादीत नाव नोंदविले आहे. तब्बल ७२ टक्के तरुण मतदार अद्याप निवडणूक प्रक्रियेपासून दूर आहेत. त्याचप्रमाणे २० ते २९ वयोगटातीलही साडेदहा टक्के तरुणांनी अद्याप मतदार यादीत नाव नोंदविलेले नाही. जनगणनेच्या आकडेवारीनुसार राज्यातील या वयोगटातील लोकसंख्या १ कोटी ६८ लाख २९ हजार १३ असून त्यापैकी १ कोटी ५० लाख ५५ हजार १८० तरुणांनीच मतदार यादीत नाव नोंदविले आहे. म्हणजे उर्वरित १७ लाख ७३ हजार ८३३ तरुणांनी निवडणूक प्रक्रियेकडे सपशेल पाठ फिरवली आहे.  म्हणजे एकूण १८ ते २९ वयोगटातील तब्बल ४५ लाख ९३ हजार ४६ तरुण येत्या लोकसभा निवडणुकीत सहभागी होणार नाहीत.  
एप्रिल-मे महिन्यात लोकसभा निवडणुका अपेक्षित असून त्याची घोषणा काही दिवसांत होण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोग तसेच शासकीय यंत्रणा जास्तीत जास्त नागरिकांना मतदान प्रक्रियेत भाग घेण्यासाठी प्रचार करीत आहे. विविध पक्षही मतदार नोंदणी मोहिमा राबवीत आहेत. मात्र तरीही पुरोगामी महाराष्ट्रातील तरुण निवडणूक प्रक्रियेविषयी फारसा गंभीर नसल्याचेच या ताज्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.
अजूनही संधी
मतदार पुनरीक्षण मोहिमेची आकडेवारी जाहीर झाली असली तरी अद्याप निवडणुका जाहीर झालेल्या नाहीत. त्यामुळे मतदानाच्या प्रक्रियेपासून दूर राहिलेल्या तरुणांना अजूनही एक संधी आहे. येत्या महिन्याअखेरीस निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. तोपर्यंत त्यांनी जास्तीत जास्त संख्येने नावे नोंदवावीत, असे आवाहन सूत्रांनी केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 14, 2014 3:10 am

Web Title: 45 lakh voters turns back to voter registration
टॅग Voter Registration
Next Stories
1 रहिवाशांच्या धाडसामुळे लुटारूला अटक
2 आनंदराज आंबेडकर, रिपब्लिकन कार्यकर्त्यांची धरपकड
3 विनोद घोसाळकर यांची न्यायालयात धाव
Just Now!
X