शहरात झोपडपट्टीत ४६ टक्के मुंबईकरांमध्ये प्रतिपिंडे तयार झाली असून गृहनिर्माण संकुलांमध्ये हे प्रमाण २१ टक्के आहे. तेव्हा पुढील काळात उच्च आणि मध्यमवर्गीयांमध्ये बाधितांचे प्रमाण अधिक असण्याची शक्यता असल्याचे शहरातील तिसऱ्या सिरो सर्वेक्षणाच्या पहिल्या टप्प्यातून निदर्शनास आले आहे.

एकीकडे शहरातील रुग्णसंख्या वाढत असताना शहरातील किती लोक बाधित होऊन गेले आहेत, याची माहिती घेण्यासाठी पालिकेने तिसरे सिरो सर्वेक्षण या महिन्यापासून सुरू केले आहे. यात शहरातील १२ हजार मुंबईकरांच्या नमुन्यांमध्ये प्रतिपिंडे तयार झाली आहेत का याची चाचपणी केली जात आहे.

खासगी आणि पालिकेच्या प्रयोगशाळांमध्ये इतर विविध आजारांसाठी येणाऱ्या रक्ताच्या नमुन्यांची प्रतिपिंड चाचणी केली जात आहे. यात खासगी आणि पालिकेच्या प्रयोगशाळांचे प्रमाण ५०-५० टक्के असणार आहे. तीन आठवड्यांमध्ये हे सर्वेक्षण केले जाणार आहे. पहिल्या आठवड्यात पालिकेच्या प्रयोगशाळांमधील ४६ टक्के नमुन्यांमध्ये प्रतिपिंडे आढळली आहेत, तर खासगी रुग्णालयात हे प्रमाण २१ टक्के आढळले आहे. सामाजिक संस्थेच्या मदतीने पालिका तिसरे सिरो सर्वेक्षण करत आहे.

‘पालिका रुग्णालयात बहुतांश झोपडपट्टीतील रुग्ण येतात तर खासगी रुग्णालयात उच्च आणि मध्यमवर्गीय रुग्णांचे प्रमाण अधिक असते. यावरून झोपडपट्टीत सुमारे ४६ टक्के लोक बाधित झाल्याचे दिसून येते. तर मध्यम आणि उच्चवर्गीयांमध्ये २१ टक्के बाधित झाले आहेत. हे पहिल्या आठवड्याचे निष्कर्ष आहेत. पुढील दोन आठवड्यांमध्ये आणखी चित्र स्पष्ट होईल,’ असे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.

संसर्गाच्या पहिल्या लाटेत बहुतांश झोपडपट्टीतील बाधित झाले होते. तर गृहनिर्माण संकुलांमध्ये संसर्ग प्रसाराचे प्रमाण तुलनेने कमी होते. त्यामुळे जे याआधी बाधित झालेले नाहीत त्यांच्यामध्ये बाधित होण्याचे प्रमाण अधिक दिसून येत आहे. परिणामी गृहनिर्माण संकुलात बाधित जास्त आढळत असल्याचे काकाणी यांनी स्पष्ट केले.