करोनामुक्त होणाऱ्यांचे प्रमाण ४६ टक्के

मुंबई : एकीकडे मुंबईमध्ये करोना रुग्णांची संख्या वाढत असताना दुसरीकडे उपचारांमुळे मृत्यूचे प्रमाण कमी राखण्यात मुंबई महापालिकेला यश मिळत आहे. आजघडीला मुंबईतील करोनाबाधितांच्या मृत्यूचे प्रमाण सरासरी ३.२ टक्केआहे, तर बरे होऊन घरी जाणाऱ्या रुग्णांचे प्रमाण सरासरी ४६ टक्केआहे.

गेल्या काही दिवसांपासून मुंबईमधील करोनाबाधितांची संख्या सातत्याने वाढत आहे. मुंबईमधील करोनाबाधितांची संख्या शनिवार, ३० मे २०२० पर्यंत ३८ हजार २२० इतकी झाली. आतापर्यंत १६ हजार ३६४ रुग्ण बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले आहे, तर एक हजार २२७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये विविध दीर्घकालीन आजार असलेल्यांची संख्या मोठी असल्याचे निदर्शनास आले आहे.

मुंबईत शनिवारी रात्रीपर्यंत रुग्णालयात दाखल रुग्णांची संख्या २० हजार ८४५ इतकी होती. मात्र त्यापैकी सात हजार ५०० रुग्ण करोना रुग्णालये वा करोना आरोग्य केंद्रांमध्ये दाखल आहेत.

लक्षणे नसलेल्या, मात्र करोनाची चाचणी सकारात्मक आलेल्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या ‘करोना शुश्रूषा केंद्र-२’मध्ये उर्वरित रुग्णांना ठेवण्यात आले आहे.

आजघडीला करोना रुग्णालय वा करोना आरोग्य केंद्रांमध्ये १० हजार, तर ‘करोना शुश्रूषा केंद्र-२’मध्ये ३० हजार खाटा सज्ज ठेवण्यात आल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली.