यंदा पावसाने पाठ फिरविल्याने राज्यातील जलाशयांमध्ये गेल्या आठ वर्षांच्या तुलनेत सर्वात कमी म्हणजेच केवळ ४७ टक्के साठा सध्या शिल्लक असून, पुढील जुलै महिन्यापर्यंत हा साठा पुरविण्याचे शासकीय यंत्रणांपुढे मोठे आव्हान आहे. ही पाश्र्वभूमी लक्षात घेता मार्चनंतर आणखी पाणीकपात करण्याशिवाय पर्याय राहणार नाही.
rah663राज्यातील जलाशयांमध्ये कोकण वगळता अन्यत्र पाण्याचा साठा तुलनेत कमीच आहे. पावसाने दगा दिल्याने सर्वत्रच पाणीकपात सुरू करावी लागली आहे. सध्या मुंबई, ठाण्यात १५ ते २० टक्के कपात असली तरी मार्चनंतर हे प्रमाण वाढवावे लागेल, असे जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. या गंभीर परिस्थितीकडे राज्य शासन, मुंबई, ठाणे तसेच अन्य महापालिकांचे जलसंपदा विभागाकडून लक्ष वेधण्यात आले आहे. कल्याण-डोंबिवलीमध्ये दोन दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येत असला तरी स्थानिक नागरिकांनी त्याला विरोध केला आहे. ठाण्यात सध्या एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवला तरी नागरिकांचे कमालीचे हाल होतात. पाण्याच्या वापरावर र्निबध आणण्याचे प्रयत्न जलसंपदा विभागाने सुरू केले आहे. गेल्या आठवडाभरात ५१३ दशलक्ष घनमीटर पाणी साठा कमी झाला आहे.
भातसा, बारवी, कोयनात समाधानकारक साठा
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या भातसा धरणात सध्या ७३ टक्के साठा असला तरी गतवर्षीच्या ८४ टक्के साठय़ाच्या तुलनेत कमीच आहे. मध्य वैतरणामध्ये ९१ टक्के साठा आहे. मराठवाडय़ातील जायकवाडीमध्ये अवघा ११ टक्के साठा असून, गेल्या वर्षी याच काळात एकूण क्षमतेच्या २९ टक्के साठा होता. कोयना धरणात ६४ टक्के साठा असून, गेल्या वर्षी याच दिवशी ८६ टक्के साठा होता. ठाणे जिल्हय़ातील महापालिकांना पाणीपुरवठा करणाऱ्या बारवी धरणात ८१ टक्के साठा आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या मोडकसागर, तानसा, विहार आणि तुळशी या जलाशयांमध्ये सरासरी ७४ टक्के साठा आहे.