स्वातंत्र्यदिनानिमित्त उपहारगृहामध्ये आणलेली मिठाई खाल्यामुळे सायन रुग्णालयातील ४७ डॉक्टरांना विषबाधा झाली. उलटय़ा आणि पोटदुखीचा त्रास होऊ लागल्याने या डॉक्टरांना तात्काळ सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले असून आता त्यांची प्रकृती स्थिर आहे.
स्वातंत्र्यदिनानिमित्त शुक्रवारी सकाळी सायन रुग्णालयाच्या उपाहारगृहामध्ये नाश्त्यासोबत तिरंगा मिठाई देण्यात आली. ही मिठाई खाल्ल्यानंतर ४७ डॉक्टरांना मळमळू लागले. काही जणांना उलटय़ा आणि पोटदुखीचा त्राल होऊ लागला. त्यामुळे या डॉक्टरांना तात्काळ सायन रुग्णालयात दाखल करुन घेण्यात आले. आता या डॉक्टरांची प्रकृती स्थिर असून डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांना आणखी एक दिवस रुग्णालयात ठेवण्यात येणार आहे.
सायन रुग्णालयाच्या उपाहारगृहात खाद्यपुरवठा करण्याचे काम कंत्राटदाराला देण्यात आले आहे. या कंत्राटदाराने सायन कोळीवाडय़ातून ही मिठाई आणली होती. या प्रकरणी सायन पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली असून पोलिसांनी सायन रुग्णालय आणि कोळीवाडय़ातील मिठाईच्या दुकानात जाऊन चौकशी केल्याची माहिती सूत्रांनी दिली.