विलेपार्लेसारख्या मुंबईतील उच्चभ्रू आणि शांत उपनगरात गुरुवारी दुपारी एका महिलेचा खून झाल्याची बातमी पसरल्यानंतर स्थानिक रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. हनुमान मंदिराजवळील सपना अपार्टमेण्टमध्ये राहणाऱ्या ४७ वर्षीय महिलेची तिच्या राहत्या घरी हत्या करून लाखो रुपयांचा ऐवज अज्ञात लोकांनी लुटल्याची माहिती पोलिसांना मिळाली. हा प्रकार दुपारी १२ ते एकच्या सुमारास घडला. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला.
विलेपार्ले येथील हनुमान मंदिराजवळील सपना अपार्टमेण्टमध्ये राहणाऱ्या विमला कारिया (४७) यांचे पती नागजीभाई बोरिवली परिसरात स्टेशनरीचा व्यवसाय करतात. नागजीभाई आणि त्यांची दोन मुले गुरुवारी सकाळी कामावर गेल्यावर विमला घरात एकटय़ाच होत्या. दुपारी त्यांची मोलकरीण कामासाठी आली असता दार वाजवूनही दार उघडण्यात आले नाही. त्यामुळे संशय येऊन त्यांच्या मोलकरणीने शेजाऱ्यांच्या मदतीने दार उघडले. त्या वेळी विमला घरात रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे आढळून आले. तसेच घरातील सामान अस्ताव्यस्त पसरले होते. या घटनेची माहिती स्थानिक रहिवाशांनी पार्ले पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन विमला यांना तातडीने कूपर रुग्णालयात दाखल केले. मात्र तेथे त्यांना मृत म्हणून घोषित करण्यात आले. घरातील लाखो रुपयांचा ऐवज लंपास झाल्याने हा खून चोरीच्या उद्देशानेच झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात मारेकऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सपना अपार्टमेण्टमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा नसून आसपासच्या इमारतींतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फूटेज आता पोलीस तपासणार आहेत.