|| सौरभ कुलश्रेष्ठ

भाजपकडून जनमताचा कानोसा

विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर भाजपने लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारबाबत जनमताचा कानोसा घेण्यासाठी प्रत्येक लोकसभा मतदारसंघातील एक हजार याप्रमाणे मतदारांशी संवाद साधत सर्वेक्षण केले असून महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघांतील ४८ हजार मतदारांचा त्यात समावेश आहे. आता त्या सर्वेक्षणातील प्रतिसादाचे विश्लेषण करून त्यानुसार प्रचाराची रणनीती ठरवण्यात येणार आहे.

तीन राज्यात भाजपचा  पराभव झाल्यानंतर  मोदी सरकारच्या भवितव्याबाबत अनिश्चितता व्यक्त केली जाऊ लागली. या पाश्र्वभूमीवर प्रत्येक लोकसभा मतदारसंघातील जनमताचा कानोसा घेण्याचे भाजपने ठरवले. त्यानुसार देशभरातील पाच लाख ४० हजार मतदारांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे.

मतदारांच्या या सर्वेक्षणासाठी  विविध आर्थिक व सामाजिक गटातील मतदारांची निवड करण्यात आली. प्रत्येक मतदाराशी जवळपास अर्धा तास संवाद साधत हे सर्वेक्षण करण्यात आले आहे. मोदी सरकारच्या योजनांचा लाभ मिळाला का, सरकारी कामकाज-व्यवस्थेत काही बदल झाला का, तो कोणामुळे झाला, मोदी सरकार पुन्हा केंद्रात सत्तेवर येण्याबाबत मत काय, अशा विविध प्रश्नांची उत्तरे या सर्वेक्षणातून घेण्यात आली आहेत, अशी माहिती उच्चपदस्थ नेत्याने दिली. तसेच याकामी भाजपची पक्षयंत्रणा आणि काही खासगी संस्थांची मदत घेण्यात आल्याची पुस्तीही या नेत्याने जोडली.

सध्या विविध माध्यमांद्वारे मोदी सरकारविरोधातील नाराजीचा मुद्दा मांडण्यात येत आहे. त्यामुळे प्रत्यक्ष जनतेच्या मनात काय सुरू आहे हे जाणून घेण्यासाठी प्रत्येक लोकसभा मतदारसंघातील एक हजार व्यक्तीशी संवाद साधण्यात आल्याने देशभरातील जनमताचा कानोसा घेणे आम्हाला शक्य झाले आहे.

त्यातून मोदी सरकारच्या कारभाराबाबत त्याचे प्रामाणिक मत आम्हाला समजेल, अशा रीतीने सर्वेक्षण झाल्याने निवडणुकीच्या प्रचाराची सुरुवात होण्यापूर्वीच जनमताची दिशा लक्षात येईल. त्यातून प्रचाराची रणनीती ठरवताना, मुद्दे ठरवताना आणि पक्ष यंत्रणा आत्मविश्वासाने लोकांना सामोरी जाण्यास मदत होईल, असे सांगण्यात आले.

मजबूत विरुद्ध मजबूर सरकारवर जोर

केंद्रात मोदी यांच्या सरकारसारखे मजबूत सरकार पुन्हा सत्तेवर येणे आवश्यक आहे. महाआघाडी व तत्सम विरोधकांचे सरकार हे मजबूर म्हणजेच कमकुवत सरकार असेल. त्यामुळे त्या राजकीय मांडणीवरही भर देण्यात येणार आहे, असेही पक्षातील वरिष्ठ पदाधिकाऱ्याने सांगितले.