मुंबईत दरदिवशी आढळणाऱ्या रुग्णांची संख्या कमी होत असून रुग्ण दुपटीचा कालावधी ४४७ दिवसांवर गेला आहे. शुक्रवारी करोनाच्या आणखी ४८२ रुग्णांची  नोंद झाली. तर ९ रुग्णांचा मृत्यू झाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबईतील करोनाची स्थिती दिवसेंदिवस सुधारत असून शुक्रवारी ४८२ नवीन रुग्ण आढळल्यामुळे एकूण बधितांची संख्या ३,०५,१३१ झाली आहे. तर  एका दिवसात ६९७ रुग्ण बरे होऊन घरी गेले. त्यामुळे आतापर्यंत  २ लाख ८६ हजाराहून अधिक म्हणजेच ९४ टक्के रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. उपचाराधीन रुग्णांच्या संख्येत घट झाली असून सध्या ६४४२रुग्ण उपचार घेत आहेत. त्यापैकी  सुमारे ३०० रुग्णांची प्रकृती गंभीर आहे.

मुंबईतील रुग्ण वाढीचा सरासरी दर ०.२१ टक्कय़ावर स्थिर आहे. रुग्ण दुपटीचा सरासरी कालावधी तब्बल ४४७ दिवसांपर्यंत म्हणजे सुमारे एक वर्षांहून जास्त झाला आहे. दर दिवशी आढळणाऱ्या रुग्णांमध्ये  लक्षणे विरहित रुग्ण मोठय़ा संख्येने आढळू लागले आहेत. त्यामुळे गंभीर स्थितीतील रुग्णांची आणि पर्यायाने दैनंदिन मृतांची संख्याही घटली आहे.

शुक्रवारी ९ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यातील ६ पुरुष होते तर ३ महिला होत्या. गेल्या नऊ महिन्यात करोनामुळे दगावलेल्यांची एकूण संख्या ११,२८५ झाली आहे.

मुंबईत दररोज सरासरी १५ हजार चाचण्या केल्या जात आहेत. त्यापैकी ५ टक्के  अहवाल बाधित येत आहेत. तर मंगळवारी तब्बल १८ हजारापेक्षा अधिक चाचण्या करण्यात आल्या. आतापर्यंत २६ लाखाहून अधिक चाचण्या करण्यात आल्या आहेत.

राज्यात २,७७९ नवे रुग्ण

राज्यात गेल्या २४ तासांत करोनाचे २,७७९ नवे रुग्ण आढळले असून, ५० जणांचा मृत्यू झाला. राज्यात सध्या ४४,९२६ रुग्ण उपचाराधीन आहेत. दिवसभरात ३,४१९ रुग्ण बरे होऊन घरी परतले. गेल्या २४ तासांत पुणे शहर २३४, पिंपरी-चिंचवड १६३, उर्वरित पुणे जिल्हा १६९ नागपूर शहर २१९ नवे रुग्ण आढळले.

ठाणे जिल्ह्य़ात ३०१ बाधित

ठाणे जिल्ह्य़ात शुक्रवारी ३०१ नवे करोनारुग्ण आढळले. तर, १० जणांचा करोनामुळे मृत्यू झाला. जिल्ह्य़ातील करोनाबाधितांची संख्या २ लाख ५१ हजार ३७५ झाली असून मृतांची संख्या ६ हजार १०४ झाली आहे. जिल्ह्य़ातील ३०१ बाधितांपैकी ठाणे महापालिका क्षेत्रात १०१, कल्याण डोंबिवलीत ८१, नवी मुंबईत ४८, मिरा भाईंदर २५, बदलापूर १८, अंबरनाथ १०, उल्हासनगर नऊ, भिवंडीतील सहा रुग्णांचा सामावेश आहे. तर, ठाणे, भिवंडी, नवी मुंबई, भिवंडी येथे प्रत्येकी दोन तसेच उल्हासनगर आणि मिरा भाईंदर येथे प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

धारावीत पुन्हा शून्य

एके काळी मुंबईतील करोनाचा अतिसंक्रमित भाग असलेल्या धारावीत शुक्रवारी एकाही नवीन रुग्णाची नोंद झाली नाही. एक महिन्यांपूर्वी देखील २५ डिसेंबरला शून्य रुग्णांची नोंद झाली होती. सामाजिक अंतर ही संकल्पनीच जिथे अशक्य आहे अशा धारावीत करोनाला थोपवणे हे पालिके पुढे मोठे आव्हान होते. एके काळी दिवसाला १०० रुग्ण जिथे सापडत होते अशा धारावीत  रुग्णसंख्या आटोक्यात आली असून सध्या या भागात केवळ १० रुग्ण उपचाराधीन आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 482 new patients in mumbai abn
First published on: 23-01-2021 at 00:23 IST