शिवसेनेचा संपाला पाठिंबा; सरकारची दडपशाही सुरूच

अवघ्या पाच हजार रुपयांमध्ये काम करणाऱ्या दोन लाख अंगणवाडी सेविकांनी मानधनवाढीसाठी ११ सप्टेंबरपासून पुकारलेल्या बेमुदत संपाचा फटका या अंगणवाडीतील पोषण आहारावर अवलंबून असलेल्या लाखो बालकांना बसू लागला आहे. संपाच्या नवव्या दिवशी सोळा आदिवासी जिल्ह्य़ातील ४९ बालकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. सरकारने हा संप चिरडण्य़ाचे काम सुरू केल्याचा आरोप अंगणवाडी सेविकांनी केला असून शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या संपाला पाठिंबा देत योग्य ती मानधन वाढ मिळालीच पाहिजे, अशी भूमिका जाहीर केली आहे.

राज्यात एकूण ९७ हजार अंगणवाडय़ा असून यापैकी नवसंजीवन क्षेत्रात म्हणजे आदिवासी जिल्ह्य़ातील अंगणवाडय़ांमध्ये शेकडो बालकांची पोषण आहाराअभावी कुपोषणाकडे वाटचाल सुरू झाली आहे. यात गेल्या नऊ दिवसात तब्बल ४९ बालकांचा मृत्यू झाल्याचे सूत्रांचे म्हणणे असून यात नाशिकमध्ये १४ बालके, नंदुरबारमध्ये १० बालके, अमरावतीमध्ये चार, पालघरमध्ये १७, गोंदियात एक, चंद्रपूरमध्ये दोन आणि ठाण्यात एका बालकाचा मृत्यू झाल्याचे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी आपले नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले. गेले नऊ दिवस या अंगणवाडय़ांअंतर्गत येणाऱ्या ७३ लाख बालकांना पोषण आहारच मिळत नसून आपल्याला किमान आठ ते १३ हजार रुपये मानधन मिळावे ही माफक मागणीही सरकार मान्य करण्यास तयार नसल्याने लाखो बालकांच्या आरोग्यचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्याचप्रमाणे तीन लाख गर्भवती महिलांच्या आरोग्य तपासणीचीही गंभीर समस्या निर्माण झाल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.

महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या माध्यमातून अंगणवाडी सेविकांच्या मानधनाबाबत तोडगा काढण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने मानधनवाढीसंदर्भात शिफारसही केली आहे. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सातशे कोटी रुपयांचा मानधन वाढीचा प्रस्ताव सादर केल्याचे मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले होते. तथापि प्रत्यक्ष चर्चेत नऊशे रुपये व अंगणवाडी मदतनीसांना पाचशे रुपये वाढ देण्याची भूमिका मांडण्यात आली. त्यातही संप मागे घेतल्यानंतरच चर्चा करून ही वाढ दिली जाईल असे खात्याच्या सचिव विनिता सिंघल यांनी सांगितल्याने बेमुदत संप करण्याशिवाय पर्याय नसल्याचे  ‘महाराष्ट्र अंगणवाडी कर्मचारी कृती समिती’चे निमंत्रक एम. ए. पाटील व शुभा शमिम यांनी सांगितले.

आज या कृती समितीने शिवसेना भवन येथे उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन दोन लाख अंगणवाडी सेविकांना कोणत्या हालाला सामोरे जावे लागते, तसेच पोषण आहाराचेही पैसे सरकार सहा-सहा महिने देत नसल्यामुळे कशी परिस्थिती उद्भवते ते सांगितले. पाच हजार रुपये अंगणवाडी सेविका व मदतनीसांना अडीच हजार रुपये मानधन मिळते एवढय़ा पैशांत घर कसे चालवायचे, असा सवालही त्यांनी केला. यावेळी तुमच्या संपला शिवसेनेचा संपूर्ण पाठिंबा राहील, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. तसेच याबाबत आपण स्वत: मुख्यमंत्र्यांशी बोलू असेही ते म्हणाले.

दरम्यान, महिला व बालकल्याण विभागाने अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा संप मोडित काढण्यासाठी आरोग्य विभागाच्या ‘आशा’ कार्यकर्त्यांना अंगणवाडी ताब्यात घेऊन पोषण आहार देण्याची जबाबदारी सोपविणारे पत्रक काढले आहे. तसेच राज्यात जागोजागी निदर्शन करणाऱ्या अंगणवाडी सेविकांवर कारवाईचे आदेश दिल्याचेही शुभा शमिम यांनी सांगितले. या संपामुळे जे बालमृत्यू होतील त्याची जबाबदारी मंत्री पंकजा मुंडे व सरकारची राहील, असेही शुभा शमिम व एम. ए. पाटील यांनी सांगितले. आता सन्मान्य तोडगा निघेपर्यंत अमचा संप सुरुच राहिल. येत्या २७ सप्टेंबर रोजी मंत्रालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

मानधन वेळेवर नाही आणि भत्तेही नाहीत..

अंगणवाडी सेविकांना मिळणारे ५००० रुपये व मदतनीसांना मिळणारे २५०० रुपयेही सरकार वेळेवर देत नाही. पोषण आहारापोटीची रक्कमही सहा-सहा महिने मिळत नाही. गेले वर्षभर नोंदणी वह्य़ाही देण्यात आल्या नसल्याने त्याचीही भरुदड अंगणवाडी सेविकांवर येतो. आजारी बालकाला रुग्णालयात पोहोचविण्यापासून ते झाडू व साबण आदी गोष्टींच्या खरेदीसाठी सरकार वर्षांकाठी एक हजार रुपये देते. तेही सरकारने गेल्या दोन वर्षांत दिलेले नाही. प्रतिबालक पोषण आहारापोटी पाच रुपये ९२ पैसे सरकार देते. यात ५० पैसे इंधनाचा खर्च असतो. या पैशात दोन वेळा खिचडी व उपमा देणे सरकारला अपेक्षित आहे. गंभीरबाब म्हणजे यापोषण आहाराची रक्कमही सरकारकडून पाच पाच महिने दिली जात नाही. – शुभा शमिम, अंगणवाडी कृती समिती निमंत्रक