२०१७ वर्षांतील आकडेवारी

देशाची अर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरात दिवसेंदिवस रस्ते अपघातांच्या संख्येत मोठय़ा प्रमाणात वाढ होत आहे. त्यानुसार २०१७ मध्ये मुंबई शहर आणि उपनगरात एकूण ४९० लोकांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला असून २०१६च्या तुलनेत हा आकडा ५ टक्क्यांनी वाढला आहे.

मुंबई शहरात गेल्या काही वर्षांत मोठय़ा प्रमाणात वाहनांची संख्या वाढली आहे. अनेकदा वाहनचालकांच्या चुकीमुळे अथवा रस्त्यांवरील खड्डे आणि इतर कारणांमुळे काही निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागत आहे. माहिती अधिकार कार्यकर्ता शकील अहमद शेख यांनी मुंबई वाहतूक पोलीस विभागाकडे १ जानेवारी २०१७ पासून डिसेंबर २०१७ पर्यंत मुंबईतील रस्ते अपघातांमध्ये किती लोकांचा मृत्यू झाला, तसेच खराब रस्ते, खड्डे आणि चुकीच्या नियमांमुळे किती जणांचे बळी गेले. त्यावर प्रशासनाने काय कारवाई किंवा बदल केले आहेत. याबाबत माहिती अधिकारातून माहिती विचारली होती.

त्यांना मिळालेल्या माहितीमध्ये १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०१७ पर्यंत मुंबई शहर आणि उपनगरात झालेल्या अपघातांमध्ये ४९० लोकांचा बळी गेल्याची माहिती त्यांना वाहतूक विभागाने दिली आहे. मात्र खराब रस्ते, खड्डे आणि चुकीच्या नियमांमुळे किती जणांचे बळी गेले आहेत, यावर वाहतूक विभागाने त्यांना काहीही माहिती दिलेली नाही. वाहतूक विभाग अभिलेखावर ही माहिती जतन केली जात नसल्याचे त्यांना माहिती अधिकारात सांगण्यात आले आहे.