संदीप आचार्य

करोनाकाळात जगभरातील रुग्णालयांमधील शस्त्रक्रिया जवळपास ठप्प झालेल्या असताना परळच्या टाटा कॅन्सर रुग्णालयाने नवा आदर्श निर्माण केला आहे. टाटा कॅन्सर रुग्णालयाने अवघ्या ३७ दिवसांत अत्यंत गुंतागुंतीच्या आणि अवघड अशा तब्बल ४९४ यशस्वी शस्त्रक्रिया पार पाडल्या आहेत. विशेष म्हणजे अमेरिकेतील हार्वर्ड विद्यापीठाच्या ‘अ‍ॅनल्स ऑफ सर्जरी’ या सायंटिफिक जर्नलने याची दखल घेतली आहे.

देशात करोनाचे रुग्ण सापडण्यास सुरुवात झाल्यानंतर बहुतेक रुग्णालयांतून अत्यावश्यक शस्त्रक्रिया वगळता नियमित शस्त्रक्रिया करणे जवळपास बंद झाले. जगातील बहुतेक रुग्णालयांत अशीच परिस्थिती आहे. पुढील वर्षांत शस्त्रक्रिया होऊ न शकल्याने २० हजार कॅन्सर रुग्णांचा मृत्यू होण्याचा अंदाज इंग्लंडमधील डॉक्टरांनी व्यक्त केला आहे. या पाश्र्वभूमीवर टाटा कॅन्सर रुग्णालयातील शस्त्रक्रिया विभागाचे प्रमुख व उपसंचालक डॉ. शैलेश श्रीखंडे यांनी एक वेगळाच निर्णय घेतला. करोनाच्या काळातही जटिल व दुर्धर शस्त्रक्रिया यशस्वीपणे करता येतात हे जगापुढे मांडण्याची भूमिका घेऊन डॉ. श्रीखंडे यांनी २३ मार्चपासून कॅन्सर रुग्णांच्या शस्त्रक्रिया करण्यास सुरुवात केली. २३ मार्च ते ३० एप्रिल या ३७ दिवसांत तब्बल ४९४ शस्त्रक्रिया यशस्वीपणे केल्या.

सर्व सहकारी, परिचारिका व इतर आरोग्य कर्मचारी यांच्या शिस्तबद्ध कामातून आम्ही यशस्वी होऊ शकलो, असे डॉ. श्रीखंडे यांनी नमूद केले. करोना काळातील या अवघड आणि आव्हानात्मक कॅन्सर शस्त्रक्रिया प्रवासाचा अहवाल डॉ. शैलेश श्रीखंडे यांनी अमेरिकेतील हार्वर्ड विद्यापीठाच्या ‘अ‍ॅनल्स ऑफ सर्जरी’ या सायंटिफिक जर्नलला सादर केला व त्यांनीही तो तात्काळ प्रसिद्ध केला.

देशातील कॅन्सर रुग्णांसाठी टाटा कॅन्सर हॉस्पिटल एक जीवनदायी रुग्णालय म्हणून ओळखले जाते. ६४० खाटा असलेल्या या रुग्णालयात वर्षांकाठी ७५ हजार रुग्ण उपचारासाठी येतात. दरमहा येथे सुमारे ८०० शस्त्रक्रिया होतात, तर ११ हजार रुग्णांवर केमोथेरपी केली जाते. याशिवाय काही हजार रुग्णांवर रेडिएशन पद्धतीने उपचार केले जातात. टाटा कॅन्सर रुग्णालयात एकूण तीन हजार कर्मचारी असून यात एक हजार प्रशासकीय, तर दोन हजार डॉक्टर, परिचारिका आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

‘अन्य देशांपुढे आदर्श’

करोनाकाळात ३० टक्के कर्मचारी ‘रोटेशन’ पद्धतीने कामावर येत असून अत्यावश्यक शस्त्रक्रिया वगळता सुरुवातीच्या काळात अन्य शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या होत्या. जवळपास ४० टक्केच शस्त्रक्रिया केल्या जात होत्या. हे प्रमाण वाढवता येते व रुग्ण आणि डॉक्टर- परिचारिका योग्य काळजी घेऊन शस्त्रक्रिया करता येतात हे यातून आम्हाला दाखवून देता आले, असे रुग्णालयाचे संचालक डॉ. राजन बडवे यांनी सांगितले. हे एक आव्हान होते. टाटा कॅन्सर व आमच्या डॉक्टरांसह सर्व कर्मचाऱ्यांनी ते यशस्वीपणे पेलले आहे. हा पेपर प्रसिद्ध झाल्यानंतर भारतासह अन्य देशांसाठी एक नवा मापदंड निर्माण झाल्याचे डॉ. बडवे यांनी सांगितले.