तस्करीविरोधात अत्यंत सतर्क असलेल्या सीमाशुल्क विभागाने शनिवारी मध्यरात्री आणि रविवारी पहाटे केलेल्या कारवायांमध्ये अमली पदार्थ आणि सोन्याची तस्करी पकडली आहे. अमली पदार्थ तस्करी प्रकरणी श्वानपथकातील अंजू नावाच्या लॅब्रेडॉर जातीच्या शुनीने सीमाशुल्क विभागाच्या कर्मचाऱ्यांची मदत केली. काँगो देशातील नागरिकाला या प्रकरणी ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याकडून तब्बल पाच कोटींचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले. तर सोन्याच्या तस्करीत ६२ लाख रुपयांचे सोने जप्त केले गेले.
शनिवारी मध्यरात्री बोकेले वेटोको हा २६ वर्षांचा काँगोचा नागरिक केनिया एअरवेजच्या विमानाने काँगोतील किन्शासा येथे जाण्यासाठी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आला. त्याच्याकडे दोन बॅगा आणि एक कापडी बॅग होती. ही कापडी बॅग सांभाळताना त्याला अडचण येत असल्याचे कर्मचाऱ्यांना दिसले. या वेळी श्वानपथकातील शुनी अंजूने बॅगेच्या दिशेने बघून भुंकण्यास सुरुवात केली. पोलिसांनी ही बॅग तपासली असता अ‍ॅम्फेटमाइन हा अमली पदार्थ सापडल्याची माहिती हवाई गुप्तचर विभागाचे अतिरिक्त आयुक्त मिलिंद लांजेवार यांनी दिली. बोकेले याने चौकशीदरम्यान मुंबईतील काही व्यक्तींची नावेही उघड केली आहे. तर सोन्याच्या तस्करीप्रकरणी तामीळनाडू येथे राहणाऱ्या अश्रफ मुहम्मद कप्पथ्थुमल याला अटक करण्यात आली. अश्रफ हा  बहारिनमार्गे दुबईहून परतत होता. त्यावेळी आपल्याकडे असलेल्या फ्लॅशलाइटची बॅटरी काढून त्यात सोन्याची बिस्किटे दडवली होती.