अभिमन्यू काळे एमटीडीसीच्या संचालकपदी; पाच महिन्यांत तिसरी बदली

मुंबई : राज्य सरकारने पाच सनदी अधिकाऱ्यांची बदली केली असून अन्न व नागरी पुरवठा विभागातील सहसचिव अभिमन्यू काळे यांची नियुक्ती राज्य पर्यटन विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी करण्यात आली आहे. गेल्या पाच महिन्यांतील काळे यांची ही तिसरी बदली आहे.

भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघासाठी झालेल्या पोटनिवडणुकीत मतदानयंत्रातील बिघाड आणि त्या प्रकरणातील प्रशासकीय शिथिलतेमुळे अभिमन्यू काळे यांची तेथील जिल्हाधिकारीपदावरून बदली झाली. त्यांची जालना येथे पाठवण्यात आले, पण प्रशासकीय प्रमुखाची जबाबदारी काळे यांच्याकडे सोपवू नये, असा केंद्रीय निवडणूक आयोगाचा आदेश असल्याने दोन दिवसांत काळे यांची पुन्हा बदली झाली. अन्न व नागरी पुरवठा विभागात सहसचिव असलेल्या काळे यांना आता महत्त्वाच्या अशा राज्य पर्यटन विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नेमण्यात आले आहे. कामगार आयुक्त एन. के. पोयम यांची बदली दुग्धविकास आयुक्त म्हणून झाली आहे. तर दुग्धविकास आयुक्त आर. आर. जाधव यांची बदली कामगार आयुक्तपदी करण्यात आली आहे.

नाशिकमधील आदिवासी आयुक्तालयातील अतिरिक्त आदिवासी आयुक्त डी. बी. गावडे यांची बदली नाशिकमध्येच राज्य आदिवासी विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी करण्यात आली आहे. माहिती तंत्रज्ञान विभागातील उपसचिव एम. जे. प्रदीप चंद्रन यांची बदली अमरावती येथे अतिरिक्त आदिवासी आयुक्त म्हणून करण्यात आली आहे.

जाधव यांच्या बदलीचा योगायोग की.?

सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्याशी संबंधित लोकमंगल समूहावर दूध भुकटी प्रकल्पाबाबत सोमवारी आरोप झाला. या प्रकरणाची दुग्धविकास विभागामार्फत चौकशी सुरू आहे. त्याच दिवशी दुग्धविकास आयुक्त आर. आर. जाधव यांची कामगार आयुक्त म्हणून बदली झाल्याने हा योगायोग की अन्य काही, अशी चर्चा सुरू झाली आहे.