१५ टनेल बोरिंग मशीन दाखल; आठ यंत्रे कार्यान्वित

मुंबई : कुलाबा-वांद्रे-सीप्झ मुंबई मेट्रो ३ प्रकल्पातील ५१०० मीटर लांबीच्या भुयारीकरणाचे काम पूर्ण झाल्याचे मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने मंगळवारी जाहीर केले.

मुंबईतील पहिल्या पूर्ण भुयारी मेट्रो प्रकल्पाचे काम वेग घेत असून विविध ठिकाणी टनेल बोरिंग मशीन भूगर्भात सोडून भुयारीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे. मेट्रो ३ प्रकल्पासाठी एकूण १७ टनेल बोरिंग मशीनची आवश्यकता असून त्या सर्वाची कारखाना स्वीकृती चाचणी यशस्वीपणे पूर्ण झाली आहे. त्यापैकी १५ मशीन मुंबईत दाखल झाली असून ८ मशीन कार्यान्वित झाली आहेत. अजून ३ मशीन भूगर्भात सोडण्याचे काम सध्या सुरू आहे, तर २ मशीन महिन्याअखेरीस भूगर्भात सोडण्यात येतील. सर्व १७ मशीन ऑक्टोबरअखेर पूर्णत: कार्यान्वित होणे अपेक्षित आहे.

मेट्रो ३ प्रकल्पात दोन्ही दिशांचे भुयारी मार्ग विचारात घेता एकूण ५२ किमीचे भुयारीकरण अपेक्षित आहे. सध्या ८ टीबीएम आठवडय़ाला ३५० मीटर या गतीने भुयारे खणत आहेत. हा वेग ऑक्टोबरपासून प्रति आठवडा ७०० ते ८०० मीटरवर जाण्याची शक्यता आहे.

भुयारीकरण सुरू  झाल्यापासून एक वर्षांच्या आतच पाच किमी लांबीच्या भुयाराचे काम पूर्ण झाल्याचे जाहीर करताना मला आनंद होत आहे. कामात सातत्याने सहकार्य करणाऱ्या मुंबईकरांचे आभार!

– अश्विनी भिडे, व्यवस्थापकीय संचालक, एमएआरसी