नवी मुंबईतल्या पांडवकडा भागात असलेल्या धबधबा परिसरातून पाच तरुणी वाहून गेल्या होत्या. यांपैकी एका तरुणीला वाचवण्यात यश आले आहे तर तीन जणींचे मृतदेह शोध पथकाच्या हाती आले आहेत. तसेच एका तरुणीचा अद्याप शोध लागलेला नाही. पांडवकडा भागात जाण्यास बंदी असूनही नियमांचे उल्लंघन करुन पर्यटक त्यांचा जीव धोक्यात घालतात हे या घटनेमुळे उघड झाले आहे.
पाहा व्हिडीओ
पोलिसांच्या माहितीनुसार, नेहा जैन (वय १९, रा.चेंबूर नाका), आरती नायर (वय १८, रा.नेरुळ) आणि श्वेता नंदी (वय १८, रा.ऐरोली) या तरुणींचे मृतदेह सापडले असून नेहा दामा या तरुणीचा अद्याप पत्ता लागलेला नाही. बचाव पथक तिचा शोध घेत आहेत.
खारघर आणि बेलापूरदरम्यान जी टेकडी आहे या टेकडीला पांडवकडा असे संबोधले जाते. पावसाळ्यात या ठिकाणी खाली पावसाचे पाणी पडत असल्याने नैसर्गिक धबधबा तयार झाला आहे. निसर्गाचे हे मोहक रुप अनुभवण्यासाठी पर्यटक या ठिकाणी हजेरी लावत असतात. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, रायगड या ठिकाणच्या पर्यटकांची या ठिकाणी उपस्थिती असते. मात्र अनेकदा या ठिकाणी पाण्याचा अंदाज न आल्याने पर्यटकांना त्यांचा जीव गमवावा लागल्याच्या घटना घडल्या आहेत. त्याचप्रमाणे आजही पाचजण वाहून गेले. ज्यापैकी एकाला वाचवण्यात आलं आहे.
शनिवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास नवी मुंबई आणि मुंबईतील महाविद्यालयातील तरुण-तरुणींचा एक ग्रुप पांडवकडा परिसरात फिरायला गेला होता. बंदी झुगारुन हे सगळेजण तिथे फिरायला गेले, त्यावेळीच ही घटना घडली.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on August 3, 2019 1:18 pm