दोन गटात हाणामारीप्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या विजय सिंह नामक २६ वर्षीय तरुणाचा पोलीस कोठडीत मृत्यू झाल्याने वडाळा ट्रक टर्मिनस पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरिक्षकासह पाच पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. मात्र, संबंधित पोलिसांवर गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी विजयच्या नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन सुरु केले आहे. पोलिसांवर गुन्हा दाखल होईपर्यंत संबंधित तरुणावर अंत्यसंस्कारही केले जाणार नाहीत असा पवित्राही त्यांनी घेतला आहे.

नातेवाईकांच्या ठिय्या आंदोलनामुळे टी. टी. पोलीस ठाण्याच्या बाहेर तणावाचे वातावरण असून लोकांना पांगवण्यासाठी त्यांच्यावर पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. तसेच येथे अनुचित घटना घडू नये म्हणून मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे. संतप्त नातेवाईकांनी सायन-पनवेल महामार्ग रोखून धरला होता तसेच पोलिसांच्या गाडीला लक्ष्य करीत एका बसवरही दगडफेक केल्याचे वृत्त आहे.

२७ ऑक्टोबरला रात्री साडेअकराच्या सुमारास एमएमआरडीए कपांऊंड या ठिकाणी काही जणांमध्ये वाद सुरु होता. यावेळी गस्तीवर असलेल्या वडाळा टी. टी. पोलिसांच्या गुन्हे प्रतिबंधक पथकाने त्यांना ताब्यात घेऊन आपल्या व्हॅनमधून पोलीस ठाण्यात नेले. तसेच त्यांच्यावर अदखलपात्र गुन्हाही दाखल करण्यात केला. मात्र, यावेळी ताब्यात घेण्यात आलेल्या विजय सिंहच्या अचानक छातीत दुखायला लागले त्यानंतर त्याला तत्काळ सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला उपचारांपूर्वीच मृत घोषीत केले, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

मात्र, पोलिसांच्या ताब्यात असताना विजय सिंहचा मृत्यू झाल्याने त्याच्या पालकांनी हा संशयास्पद मृत्यू असल्याचे सांगत याबाबत आवाज उठवला. त्यानंतर आज (दि.२९) संबंधीत पाच पोलिसांचे निलंबन करण्यात आले.