मुंबई पोलिसांनी फक्त चार तासात अपहरणग्रस्त पाच वर्षाच्या मुलाची सुटका केली आहे. सकाळी ११ वाजता मुलाचं अपहरण झालं होतं. मुलाचे वडिल एका गारमेंट फॅक्टरीमध्ये सुपरवायजर म्हणून काम करतात. दुपारी २ वाजता साकिनाका पोलिसांना मुलाचं अपहरण झाल्याची माहिती मिळाली. सहा वाजता पोलिसांनी आरोपीला अटक करत मुलाची सुटका केली होती.

आरोपी अक्रम खान (२१) आणि त्याच्या प्रेयसीने मुलाच्या वडिलांना १ लाख रुपयांची खंडणी मागण्यासाठी फोन केला आणि तिथेच ते फसले. या एका फोन कॉलच्या आधारे पोलिसांनी प्रकरणाचा उलगडा करत आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी अक्रम खानला अटक केली असून त्याच्या प्रेयसीला पोलीस ठाण्यात हजर राहण्यासाठी समन्स बजावण्यात आलं आहे.

अक्रम खान याचं पीडित मुलाच्या घराबाहेर ज्यूसचं दुकान आहे. काही दिवसांपुर्वीच त्याने हा कट रचला होता. खंडणीत मिळालेल्या पैशातून तो आपलं कर्ज फेडणार होता. महत्त्वाचं म्हणजे मुलगा बेपत्ता झाल्यानंतर आपल्यावर कोणाला संशय येऊ नये यासाठी मुलाच्या वडिलांसोबत तो शोधाशोध करण्याचं नाटक करत होता अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

पोलिसांनी सांगितल्यानुसार, आरोपी अक्रम खान नेहमी पीडित मुलाच्या घरी येत असे. गुरुवारी चहा पिण्याचा बहाणा करत तो त्यांच्या घरी गेला होता. यावेळी त्याची प्रेयसी बाहेर वाट पाहत होती. तेथूनच तिने त्याचं अपहरण केलं. मित्राच्या घरी मुलाला बंदिस्त ठेवण्यात आलं होतं.

अक्रम खानने मुलाच्या वडिलांना फोन करत खंडणीची मागणी केली. सोबतच पैसे न मिळाल्यास मुलाची हत्या करु अशी धमकीही दिली. पोलिसांनी फोनच्या आधारे तपास करत अक्रम खानला अटक केली आहे. चौकशीत त्याने आपला गुन्हाही कबूल केला आहे.