लहान मुलांना अनेकदा खेळता खेळता वस्तू तोंडात टाकण्याची सवय असते. काहीवेळा गिळलेली वस्तू जीवावर बेतू शकते. उरण येथे रहाणाऱ्या समृद्धी संजय पवार या अवघ्या पाच वर्षाच्या मुलीच्या बाबतीतही असाच प्रकार घडला. समृद्धीने चक्क एलईडी बल्ब गिळला होता. पण नशीबाची साथ आणि डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळे समृद्धी या जीवघेण्या संकटातून बाहेर पडू शकली.

१६ नोव्हेंबर २०१८ रोजी दिवाळीच्यावेळी घराच्या सजावटीसाठी हा एलईडी बल्ब आणला होता. समृद्धीने हा बल्ब उचलला व तोंडात टाकला आणि पटकन तिने तो गिळला. बल्ब गिळल्यानंतर समृद्धीला खोकला सुरु झाला व तिला श्वासोश्वास करताना त्रास होऊ लागला. समृद्धीची आई रुपाली तिला नजीकच्या रुग्णालयात घेऊन गेली. तिथे ब्रॉनचोस्कोपी सुरु असताना समृद्धी बेशुद्ध झाली. त्यामुळे तिला व्हेंटिलेटरवर ठेवावे लागले. मिड डे ने हे वृत्त दिले आहे.

पहिल्या हॉस्पिटलमध्ये एन्डोस्कोपी शस्त्रक्रियेद्वारे ती वस्तू बाहेर काढण्याचा प्रयत्न झाला. अन्न नलिकेत तो बल्ब अडकला असावा असा डॉक्टरांचा अंदाज होता. ब्रॉनचोस्कोपी फेल गेल्यानंतर तिला कार्डिअॅक अरेस्ट झाला. त्यावेळी तिच्या ह्दयाला चार डीसी शॉक देऊन ह्दयक्रिया सुरु ठेवली. शस्त्रक्रियेच्यावेळी फुफ्फुसामधूनही मोठया प्रमाणावर रक्तस्त्राव झाल्यामुळे तिला व्हेंटिलेटरवर ठेवावे लागले होते.

त्यानंतर दुसऱ्याच दिवशी तिला लिलावती रुग्णालयात हलवण्यात आले. तिथे १८ नोव्हेंबरला डॉक्टरांनी शस्त्रक्रियाद्वारे बल्ब बाहेर काढला. समृद्धीची प्रकृती आता व्यवस्थित आहे पण तिला नियमित तपासणीसाठी जावे लागते. बल्बला जोडलेल्या दोन धातूच्या ताराही फुफ्फुसात आत अडकल्या होत्या. त्यामुळे ही शस्त्रक्रिया कठिण होती. पण डॉक्टरांनी यशस्वी शस्त्रक्रिया करुन समृद्धीचे प्राण वाचवले.