करोनामुक्त होण्याचे प्रमाण ९३ टक्के

मुंबई : करोनामुळे आतापर्यंत बेस्टमधील ५० कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. बेस्टमध्ये करोनापासून बरे होण्याचे प्रमाण ९३ टक्क्यांपर्यंत आहे. करोनामुक्त होण्याचे प्रमाण जरी चांगले असले तरी मृतांच्या वाढत्या संख्येबद्दल चिंता व्यक्त होत आहे.

टाळेबंदी लागू झाल्यापासून मुंबई महानगरात गेल्या सात महिन्यांपासून बेस्ट उपक्र म आपली परिवहन सेवा देत आहे. परिवहनबरोबरच विद्युत विभाग,अभियंता, सुरक्षारक्षक व अन्य विभागांतील कर्मचारीही कार्यरत आहेत. परिवहन आणि विद्युत विभागातील काही कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाली आहे, तर सुरुवातीच्या काळात काही कर्मचारी कर्तव्यावर नसतानाही करोनाबाधित झाले. साधारण जूनच्या पहिल्याच आठवडय़ात १४० कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाली, त्यापैकी ८ जणांचा मृत्यू झाला होता. यामध्ये आता वाढ झाली आहे. आतापर्यंत एकू ण २ हजार ५०५ करोनाबाधित कर्मचारी बरे झाले आहेत, तर गेल्या एक आठवडय़ापासून प्रतिदिन करोनाबाधित होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या संख्येमध्ये लक्षणीय घट झाली असून ही संख्या ३०० वरून ९० वर आली आहे.

मृत कर्मचाऱ्यांची संख्या मात्र वाढतच असून ५० कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली.

मदत आणि नोकरी

करोनाकाळात कर्तव्यावर असताना मृत झाल्यास त्यांच्या वारसांना ५० लाख रुपयांची मदत देण्यात येत आहे, तर मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपातत्त्वावर नोकरीही देण्यात येत असून त्याची प्रक्रिया बेस्टकडून पार पाडली जात आहे.