संदीप आचार्य

मुंबई: करोनाच्या लढाईत महाराष्ट्रात खासगी व्यवसाय करणारे ५० डॉक्टर शहीद झाले तर सरकारी सेवेतीलही अनेक डॉक्टरांना मृत्यूने गाठले. मात्र करोनाच्या लढाईत मरण पावलेल्या डॉक्टरांच्या कुटुंबीयांना मिळणारे ५० लाखांचे विमा कवच हाताच्या बोटावर मोजणाऱ्या लोकांनीच घेतल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.

करोनाच्या साथी विरोधात लढणारे डॉक्टर तसेच अन्य आरोग्य कर्मचारी या लढाईत मृत्यू पावल्यास त्यांच्या कुटुंबीयांना ५० लाख रुपये विमा कवचापोटी देण्याची योजना केंद्र सरकारने ३० मार्चपासूनच लागू केली होती. देशभरातील शासकीय व निमशासकीय तसेच खासगी व्यवसाय करणारे डॉक्टर तसेच आरोग्य सेवकांचा करोनाच्या लढाईत मृत्यू झाल्यास ५० लाख रुपये त्यांच्या वारसांना मिळतील अशी यामागची संकल्पना होती. ही योजना ३० मार्चपासून ९० दिवसांसाठी म्हणजे जूनअखेरपर्यंत लागू होती. तथापि केंद्र सरकारने करोनाचे देशातील वाढता करोना लक्षात घेऊन या योजनेला मुदतवाढ दिली असून आता ३० सप्टेंबर २०२० अखेरपर्यंत ही योजना कायम राहाणार आहे.

करोनाच्या लढाईत देशभार मोठ्या प्रमाणात डॉक्टर तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांचे मृत्यू झाले असले तरी केंद्र सरकारच्या या विमा कवच योजनेची माहिती प्रभावीपणे न पोहोचल्यामुळे फारच थोड्या डॉक्टर व आरोग्य कर्मचार्यांच्या कुटुंबीयांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. महाराष्ट्रातही फारच थोड्या आरोग्य कर्मचार्यांपर्यंत या योजनेची माहिती मिळाली असवी परिणामी ज्या प्रमाणात आरोग्य कर्मचीर्यांचे मृत्यू झाले त्यातुलनेत महाराष्ट्रामधून विमा कवच मिळावे यासाठी अर्ज गेले नसल्याचे ‘राज्य आरोग्य हमी सोसायटीचे’ मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधाकर शिंदे यांनी सांगितले. ही योजना केंद्र सरकारने आणल्यानंतर डॉ. शिंदे यांनी डॉक्टरांची आयएमए तसेच वेगवेगळ्या आरोग्य संघटनांना स्वत: माहिती कळवली होती.

याबाबत ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’चे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांना विचारले असता राज्यात करोनाच्या लढाईत खासगी व्यवसाय करणारे ५० डॉक्टर शहीद झाल्याचे तर ४१७० डॉक्टरांना करोना झाला व उपचारानंतर ते बरे झाल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. भोंडवे यांच्या म्हणण्यानुसार केवळ शासकीय तसेच शासकीय सेवेत मदत करणाऱ्या खासगी डॉक्टर व आरोग्य कर्मचारी यांनाच या योजनेचा लाभ असून निव्वळ खासगी व्यवसाय करणार्या डॉक्टरांचा या योजनेत समावेश नाही. तसेच खासगी डॉक्टरांना पीपीइ किट मिळण्यात अडचणी असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. याबाबत राज्याच्या आरोग्यमंत्र्यांना निवेदन दिल्याचे त्यांनी सांगितले. तथापि केंद्र सरकारच्या योजनेत शासकीय डॉक्टरांप्रमाणेच खासगी डॉक्टरांनाही ५० लाखाचे विमा कवच असल्याचे डॉ. सुधाकर शिंदे यांनी सांगितले.

आपण ही संपूर्ण योजना अगदी अर्ज कसा भरावयाचा याच्या माहितीसह डॉक्टरांच्या तसेच विविध आरोग्य संघटनांना, जिल्हाधिकारी, अधिष्ठाता आदींना पाठवली होती, असे डॉ. शिंदे यांनी सांगितले. आता या योजनेला सप्टेंबर अखेरपर्यंत मुदतवाढ मिळाली असून करोनाच्या लढाईत शहीद झालेल्या डॉक्टरांच्या कुटुंबीयांनी या योजनेतून ५० लाखांचे विमा कवच घ्यावे तसेच याची माहिती डॉक्टरांच्या संघटनांनी जास्तीतजास्त डॉक्टरांपर्यंत पोहचवावी, असे आवाहन डॉ. सुधाकर शिंदे यांनी केले आहे.