पॉपकॉर्नचे आजवर किती फ्लेव्हर्स तुम्ही चाखलेले आहेत? दोन, पाच, दहा? पण मुंबईतील एका कोपऱ्यावर पॉपकॉर्नचे तब्बल पन्नास फ्लेव्हर्स मिळतात, याची तुम्हाला माहिती आहे का? थिएटरमध्येच भाव खाणारा हा पदार्थ आता नाक्यानाक्यावर आणि अगदी रेल्वे स्टेशनवरही मिळू लागला. पण पॉपकॉर्नचं जग खरंच अनुभवयाचं असेल तर ‘शम्स फास्ट फूड’ला जरूर भेट द्यायला हवी.

काही महिन्यांपूर्वी शमसुद्दीन शेख यांच्या लक्षात आलं की बाजारात वेगवेगळ्या चवीचे चिप्स मिळतात. लहान मुलं ते आवडीने खातात. परंतु अनेकदा तळलेले आणि मसालेदार चिप्स मुलांसाठी खरेदी करताना पालक नाक मुरडतात. त्यामुळे वेगवेगळ्या फ्लेव्हर्सचा प्रयोग पॉपकॉर्नमध्ये करण्याची कल्पना शमसुद्दीन यांना सुचली. नेहमीच्या चार-पाच फ्लेव्हर्सपासून सुरुवात केल्यानंतर आजघडीला इथे पन्नासहून अधिक फ्लेव्हर्सचे पॉपकॉर्न मिळतात. त्यामुळे दररोज एक फ्लेवर चाखायचा म्हटलं तरी कमीत कमी दोन महिने खर्ची पडतील. विशेष म्हणजे, इतके सारे फ्लेव्हर्स असल्याने एकाच वेळी सर्व फ्लेव्हर्स बनवून ठेवणं शक्य नाही. त्यामुळे रेग्युलर फ्लेव्हर्सशिवाय तुमच्या आग्रहाखातर आवडीच्या चवीचे गरमागरम पॉपकॉर्न समोर तयार करून दिले जातात.

सॉल्टेड रेग्युलर, अमूल बटर, चीझ, चिली चीझ, चीझ गार्लिक ब्रेड, चीझ टोमॅटो, टोमॅटो, चिली टोमॅटो, नाचोज, मंच्युरियन, सेझवान, लाइम अ‍ॅण्ड स्पाइसी, जलपिनो, सॉफ्ट क्रीम आणि ओनियन, पेरी पेरी, अमेरिकन चॉप्सी, पुदिना, सिझलिंग बार्बेक्यू, मसाला मॅजिक, चॉकलेट कॅरेमल, पिझ्झा, पंजाबी तडका, पानीपुरी असे एकाहून एक सरस फ्लेव्हर्सचे पॉपकॉर्न येथे मिळतात. यातील काही फ्लेव्हर्सचे मसाले बाजारात तयार मिळतात तेच आम्ही वापरतो, अशी प्रांजळ कबुली शमसुद्दीन देतात. तर काही फ्लेव्हर्स आम्ही प्रयोगातून आणि लोकांनी केलेल्या मागणीतून तयार केल्याचं ते सांगतात.

इथे मिळणारे कॅरेमल पॉपकॉर्न लोकांच्या सर्वाधिक आवडीचे आहेत. चांगल्या प्रतीच्या मक्याच्या दाण्यांपासून अत्याधुनिक मशीनवर पॉपकॉर्न तयार केले जातात. त्याचं पॅकिंगही अशा पद्धतीने केलं जातं की जवळपास वीस दिवस त्याचा कुरकुरीतपणा टिकून राहतो.

पॉपकॉर्नसोबतच शेजारीच चाट पदार्थदेखील मिळतात. पानीपुरी, सेवपुरी, भेळ, समोसा भेळ, कचोरी भेळ याच्या जोडीने एक वेगळा पदार्थ तुमचे लक्ष वेधून घेतो त्याचं नाव आहे ‘छोटा ब्लास्ट’. बटाटय़ाला आधी उकडवून घेऊन नंतर त्याला कोळशामध्ये भाजलं जातं. त्यानंतर त्याची साल काढून तो उभा धरून मधून आडवा चिरला जातो. आइसक्रीमच्या स्कूपने बटाटय़ाचा मधला ऐवज काढल्यानंतर तयार झालेल्या पोकळीत सर्वप्रथम लिंबू पिळण्यात येतो. त्यावर चाट मसाला, तिखट, गोड आणि लसणाची चटणी टाकण्यात येते. सुरुवातीला काढण्यात आलेल्या बटाटय़ाच्या ऐवजामध्ये बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो आणि चीझ कुस्करून एकजीव केलेलं मिश्रण त्या पोकळीत पुन्हा भरलं जातं. त्यावर पुन्हा गोड चटणी टाकून वरून चीझ किसण्यात येतं. तिखट मसाला भुरभुरला जातो आणि डाळिंबाचे दाणे, मसाला शेंगदाण्यांनी ते सजवून तुमच्या हवाली केलं जातं. चमच्याने तुकडे करून खाण्यापेक्षा जबडा शक्य तेवढा उघडून बटाटय़ाचा संपूर्ण काप तोंडात घातल्यास या ब्लास्टची खरी मजा अनुभवता येते. कोळशाचा स्मोकी फ्लेवर, बटाटय़ाचा गोडसरपणा, स्मूथ चीझ असा पोट गच्च करणारा आणि मन तृप्त करणारा आगळावेगळा पदार्थ अफलातून आहे.

पॉपकॉर्न आणि छोटा ब्लास्ट खाऊन झाल्यावर शेवट रस पिऊन करावा. समोरच शमसुद्दीन यांचे चाचा झैनुद्दीन पेहेलवान यांनी सुरू केलेलं पेहेलवान ज्यूस सेंटर आहे. इथल्या उसाच्या रसाचा रंग दुधाच्या रंगासारखा पांढरा दिसतो.रस ताजा असेल तर इतर गोष्टींची आवश्यकता नसते असं शमसुद्दीन यांचं मत.

शम्स फास्ट फूड आणि कॅटरिंग सव्‍‌र्हिस

  • कुठे – शॉप क्रमांक १-बी, लेहरी मंझिल, फूल गल्ली मस्जिद, पेहेलवान ज्यूस सेंटर समोर, शालिमार कूल पॉइंटजवळ, नळ बाझार, मुंबई – ४००००३
  • कधी – सोमवार ते रविवार सकाळी ११ ते रात्री १०.३० वाजेपर्यंत.

@nprashant

nanawareprashant@gmail.com