तोटय़ात असल्याचे कारण देत बेस्ट प्रशासनाने भर उन्हाळ्यात वातानुकूलित बस सेवा बंद केल्या असल्या तरी आता पुन्हा प्रवाशांच्या मागणीचा विचार करत मिनी वातानुकूलित बस सेवा सुरु करण्याचा बेस्टचा विचार आहे. तसेच या गाडय़ा भाडेतत्त्वावर घेऊन ठराविक मार्गाकरिता व प्रवाशांकरिता राखीव ठेवता येणार आहेत. त्या करिता बेस्टच्या ताफ्यात छोटय़ा आकाराच्या ५० बसगाडय़ा दाखल होणार असून तसा प्रस्ताव पुढील आठवडयात होणाऱ्या बेस्ट समितीसमोर सादर करण्यात येईल, असे बेस्टमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

या लहान वातानुकूलित बसमध्ये २१ प्रवासी बसू शकतील व ८ जण उभ्याने प्रवास करु शकतील, अशी सोय असणार आहे. भाडे तत्त्वावर या बस बेस्टच्या ताफ्यात दाखल होणार असून बस खरेदी, देखभाल, वाहकाचे वेतन आदी खर्च वाचणार आहे. बस भाडे तत्त्वावर घेऊन चालविण्यात येणार असून त्यासाठी बेस्टला नाममात्र गुंतवणूक करावी लागेल. तसेच, सात वर्षांनंतर गाडय़ा बेस्टच्या मालकीच्या होणार आहेत.

वातानूकुलित बससेवा बंद केल्याबद्दल अनेक प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली होती. अनेकांनी या बससेवा पुन्हा सुरू कराव्या, अशी मागणी ईमेलद्वारे बेस्ट प्रशासनाला केली आहे. त्यामुळे एखाद्या मार्गावर दिवसाला ४५ पासधारक जर प्रवास करण्यास तयार असतील तर आम्ही पुन्हा वातानुकुलीत बससेवा सुरु करण्याचा विचार करू, जेणेकरून त्या बसच्या देखभालीचा खर्च निघेल, असे बेस्टच्या एका उच्चाधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. या प्रकारची सेवा सध्या वांद्रे-कुर्ला संकुल येथे देण्यात येत आहे. फक्त ही बस बेस्टच्या मालकीची आहे. याच धर्तीवर ४५ प्रवासी मिळाल्यास वातानुकूलित सेवा इतरही ठिकाणी सुरू करता येईल. फक्त या बसगाडय़ा बेस्टच्या मालकीच्या नसतील, असेही या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.