“दुष्काळ, दंगल किंवा युद्ध अशी कोणतीही मानवनिर्मित आपत्ती असो, त्यात सर्वात जास्त होरपळल्या जातात, त्या महिलाच. म्हणूनच मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या ‘युद्ध नको’ या भूमिकेचं भारतातील आणि पाकिस्तानातील ‘५० % लोकसंख्या’ म्हणजे महिला स्वागत करतील, याची खात्री आहे. कारण, “युद्धात जिंकत कोणीच नाही, फक्त कुटुंबं उद्ध्वस्त होतात, आणि दुःख सहन करायला उरतात त्या फक्त विधवाच! हाच आजवरच्या युद्धांचा इतिहास आहे (In war, there are no winners, only widows!)” असं मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी व्यक्त केलं आहे.

कालच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी व्हिडिओद्वारे व्यक्त केलेल्या भूमिकेला पाठींबा देणारं मत एका पत्रकाद्वारे व्यक्त केलं होतं. ” युद्ध किंवा युद्धजन्य परिस्थिती हे कोणत्याही प्रश्नाचं उत्तर होऊ शकत नाही. आणि त्याचा फायदा करून घेणं हे कोणत्याही उमद्या राजकारण्याचं लक्षण असू शकत नाही, हे सत्ताधाऱयांनी लक्षात ठेवावं” या शब्दात राज यांनी आपली भूमिका मांडली होती.

“देशातील आणि महाराष्ट्रातील सत्ताधारी यांना जरी युद्ध हवं असलं, युद्धजन्य परिस्थितीत त्यांना त्यांचा राजकीय लाभ दिसत असला, तरी राजसाहेबांनी मात्र अशा संधीसाधू राजकारणाला ठाम विरोध दर्शवून आपलं वेगळेपण दाखवून दिलं आहे. या भूमिकेचं भारत आणि पाकिस्तानातील प्रत्येक महिला निश्चितच स्वागत करेल, याची खात्री वाटते”, असंही मत शालिनी ठाकरे यांनी व्यक्त केलंय.