महापालिकेचा निर्णय; रुग्णांकडे बारकाईने लक्ष देण्याची सूचना
मुंबई : शहरात अचानकपणे वाढणाऱ्या रुग्णसंख्येमागे विषाणूचे बदलते स्वरूप कारणीभूत आहे का याचा अभ्यास करण्यासाठी दर दोन ते तीन दिवसांनी ५० रुग्णांचे नमुने जनुकीय क्रमनिर्धारणासाठी (जिनोम सिक्वेन्सिंग) देण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. तसेच यादृष्टीने रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांकडेही बारकाईने लक्ष देण्याची सूचनाही पालिकेने दिली आहे.
शहरातील रुग्णसंख्या एका आठवड्यात दुपटीने वाढली असून रविवारी १९६२ नव्या रुग्णांचे निदान झाले. शहरात एका दिवसांत २०० ते ३०० रुग्णांची वाढ यापूर्वी कधीच झालेली नाही. त्यामुळे बाहेरील देशातून उत्परिवर्तित विषाणूचा प्रसार शहरात झाला आहे का अशी शंका व्यक्त केली जाते आहे. संसर्ग प्रसाराची तीव्रता लक्षात घेता शहरात ब्रिटनमधील उत्परिवर्तित विषाणूचा प्रसार झाला असावा किंवा इतर देशांतील प्रवासी अन्य विमानतळावर उतरून शहरात दाखल झाले असतील. शहरातील विषाणू उत्परिवर्तन झाले असण्याची शक्यता आहे, असे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
गेल्या महिन्यात १०० रुग्णांचे नमुने चाचणीसाठी पाठविले होते. त्यात विषाणू उत्परिवर्तित झाल्याचे दिसून आले नाही. या चाचण्या करण्यासाठी वेळ लागत असल्याने नमुने दिल्यापासून १५ दिवसांनी अहवाल येतात. यादृष्टीने आता दर दोन ते तीन दिवसांनी ५० नमुने पाठविण्यात येणार आहेत. जेणेकरून एकापाठोपाठ एक नमुने गेल्यानंतर उत्परिवर्तित विषाणू असल्यास काही दिवसांनी का होईना चाचण्यांमधून स्पष्ट होईल, असे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.
रुग्णालयांना सज्जतेच्या सूचना
वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमी वर रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या येत्या काही दिवसांत आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने रुग्णालयांसोबत आढावा बैठक पालिकेने रविवारी घेतली. रुग्णसंख्या वाढली तरी अद्याप मृत्यूचे प्रमाण वाढलेले नाही. परंतु आजाराच्या स्वरूपात काही बदल होत असल्यास वेळीच लक्षात यावे यादृष्टीने रुग्णालयांत पुढील काही दिवसांत दाखल होणारे रुग्ण नेमक्या कोणत्या वयोगटांतील आहेत, तसेच रुग्ण बरे होण्यास किती दिवसांचा कालावधी लागतो याच्या नोंदी करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. तसेच औषधे, ऑक्सिजन, अतिदक्षता विभाग इत्यादी सुविधा तयार ठेवण्याचेही आदेश दिल्याची माहिती काकाणी यांनी दिली.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on March 16, 2021 1:58 am