मुंबईला पावसाचा दिलासा; पाच दिवसांत १६ टक्के वाढ

मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांत मिळून ५० टक्के पाणीसाठा झाला आहे. गेल्या चार दिवसांत पडलेल्या पावसाने जलसाठय़ात भर घातली आहे.

सातही तलावांत मिळून ७ लाख ३१ हजार दशलक्ष लिटर पाणीसाठा झाला आहे. जुलै महिन्यात पावसाने मारलेली दडी आणि करोनामुळे स्वच्छतेसाठी झालेला पाण्याचा अतिरिक्त वापर यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील पाणीसाठा कमी झाला होता. त्यामुळे ५ ऑगस्टपासून पालिकेने २० टक्के पाणीकपात लागू केली होती. ही कपात लागू केली त्या दिवसापासूनच मुंबई आणि आसपासच्या परिसरांत पावसाने पुन्हा हजेरी लावली आहे. त्यामुळे या पाच दिवसांत पाणीसाठा वाढला आहे. ४ ऑगस्टला अवघा ३४ टक्के पाणीसाठा होता. मात्र ९ ऑगस्टला पाणीसाठा ५० टक्क्यांपर्यंत गेला आहे. विहार आणि तुळशी ही दोन धरणे पूर्ण भरली आहेत. मात्र गेल्या वर्षी याच दिवशी ९१ टक्के पाणीसाठा होता. त्यामुळे अजून ५० टक्क्यांची तूट पावसाळ्याच्या दोन महिन्यांत भरून निघणे आवश्यक आहे.

उर्ध्व वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार व तुळशी या सात तलावांत मिळून १ ऑक्टोबर रोजी १४ लाख ४७ हजार दशलक्ष लिटर पाणीसाठा जमा झाल्यास मुंबईला वर्षभर पाणी पुरते. मुंबईला दर दिवशी ३८०० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. वर्षभर पाणीकपात न करता पाणीपुरवठा करण्यासाठी धरणे १०० टक्के भरणे आवश्यक आहे. त्यामुळे धरणांच्या जलसाठय़ात अद्याप ५० टक्के पाणीसाठय़ाची गरज आहे.

पाच दिवसांत भरघोस वाढ

धरणे                     पाणीसाठा      टक्केवारी

उर्ध्व वैतरणा           ६९६०५             ३०.६६

मोडक सागर            ७७३४२            ५९.९९

तानसा                     ६९२०३            ४७.७०

मध्य वैतरणा          १,०२,०७४       ५२.७४

भातसा                    ३,७७,३१४        ५२.६२

विहार                      २७,६९८             १००

तुळशी                     ८,०४६               १००

एकूण                    ७,३१,२८३         ५०.५३

(*दशलक्ष लिटर)

५,०५,८९६ दशलक्ष लिटर (३४ टक्के) ४ ऑगस्टचा पाणीसाठा

७,३१,२८३ दशलक्ष लिटर (५० टक्के) ९ ऑगस्टचा पाणीसाठा