|| संदीप आचार्य

आरोग्य विभागाची आकडेवारी अर्धवट; डॉ अभय बंग यांचा दावा

आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी अलीकडेच विधिमंडळात सादर केलेली राज्यातील बालमृत्यूंची आकडेवारी अपुऱ्या माहितीवर आधारित आहे. राज्यात साडेतेरा हजार बालमृत्यू होत असल्याची माहिती त्यांनी दिली असली तरी प्रत्यक्षात केंद्र शासनाच्या ‘सॅम्पल रजिस्ट्रेशन सिस्टिम’अहवालानुसार महाराष्ट्रात किमान ५० हजार बालमृत्यू दरवर्षी होत असून ते रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करणे अत्यावश्यक असल्याचा दावा आरोग्य क्षेत्रातील ज्येष्ठ कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांनी केला. गंभीर बाब म्हणजे, यातील ७० टक्के मृत्यू एक महिन्याच्या आतील बालकांचे आहेत.

महाराष्ट्राचा बालमृत्यूदर २०१३ साली दर हजारी २६ होता तो २०१६ साली २१ वर आला असून गेल्या वर्षी वीस लाख बालकांचे लसीकरण करण्यात आल्याचे सांगत आरोग्यमंत्र्यांसह आरोग्य विभागाचे अधिकारी आपली पाठ थोपटून घेत असले तरी ती शुद्ध फसवणूक असल्याचे डॉ. अभय बंग यांचे म्हणणे आहे. राज्यातील बालमृत्यू रोखण्यासाठी विविध उपाययोजना करूनही एप्रिल २०१७ ते फेब्रुवारी २०१८ या कालावधीत १३ हजार ५४१ बालमृत्यू झाल्याचे दीपक सावंत यांनी विधिमंडळात तारांकित प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

अलीकडेच केंद्र शासनाने प्रसिद्ध केलल्या अहवालात दर हजारी २१ एवढा अर्भक मृत्यूदर नोंदविण्यात आला आहे. अर्भक मृत्यू याचा अर्थ ० ते एक वर्षांच्या आतील बालकांचा मृत्यू असा असून राज्यात दर वर्षी सुमारे २० लाख बालकांचा जन्म होत असल्याचे लक्षात घेता किमान ४२ हजार एवढा अर्भक मृत्यूदराची नोंद होणे आवश्यक आहे. याशिवाय एक वर्ष ते पाच वर्ष वयोगटातील ज्या बालकांचा मृत्यू दरवर्षी होतो त्याचा विचार करता महाराष्ट्रात दरवर्षी ५० हजाराहून अधिक बालकांचा मृत्यू होत असून तो कमी करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याऐवजी कमी आकडेवारी नोंदवून आरोग्य विभाग नेमके काय साधू पाहाते असा सवालही डॉ. बंग यांनी केला.

आम्ही २००० साली ‘कोवळी पनगळ’ हा अहवाल तयार केला होता. त्यात राज्यातील बालमृत्यू व त्याची कारणमीमांसा आणि उपाय यावर सखोल विवेचन केले होते. आज १८ वर्षांनंतरही परिस्थिती जै थे असल्याचे डॉ. बंग म्हणाले. यातील गंभीरबाब म्हणजे एकूण बालमृत्यूपैकी ७० टक्के बालमृत्यू हे पहिल्या महिन्यात होत असून त्यांना वाचवणे हे एक मोठे आव्हान आहे. गडचिरोलीत गावातील महिलेस ‘आरोग्य दूत’बनवून आम्ही जो उपक्रम राबविला त्यातून बालमृत्यू रोखण्यात मोठे यश आले. राज्यात आजघडीला ५८ हजार ‘आशा वर्कर’आहेत. त्याची संख्या वाढवून व त्यांना या कामासाठी ठोक रक्कम दिल्यास बालमृत्यू रोखता येतील असे त्यांनी सांगितले.