‘एमआरव्हीसी’कडून ‘एमयूटीपी-३ ए’ प्रकल्प योजना; रेल्वे बोर्ड अध्यक्षांसमोर सादरीकरण

वाढत जाणारी प्रवासी संख्या, वाढणाऱ्या लोकल फेऱ्या आणि उपनगरीय रेल्वे मार्गावर पडणारा ताण पाहता एमआरव्हीसीकडून (मुंबई रेल्वे विकास महामंडळ) मुंबई उपनगरीय रेल्वेसाठी एमयूटीपी-३ ए अंतर्गत ५० हजार कोटी किमतीचे प्रकल्प तयार करण्यात आले आहेत. त्याचे सादरीकरण शुक्रवारी रेल्वे बोर्ड अध्यक्ष अश्विनी लोहाणी यांच्यासमोर करण्यात आले. यामध्ये हार्बरवरील गोरेगावचा बोरिवलीपर्यंत विस्तार, कल्याण ते बदलापूर तिसरा आणि चौथा मार्ग यासह काही नवीन प्रकल्पांचा समावेश करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे यापूर्वी एमयूटीपीत समावेश नसलेल्या आणि दोन जुन्या अशा सीएसएमटी ते पनवेल उन्नत जलद रेल्वे प्रकल्प, पनवेल ते विरार नवीन उपनगरीय रेल्वे मार्गाचाही समावेश करण्यात आल्याची माहिती मुंबई रेल्वे विकास महामंडळाकडून देण्यात आली.

सीएसएमटी स्थानकात मध्य रेल्वे, पश्चिम आणि एमआरव्हीसीच्या अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत प्रामुख्याने एमयूटीपी-३ अंतर्गत केल्या जाणाऱ्या प्रकल्पांवर चर्चा करण्यात आली. सध्या एमयूटीपी-३ अंतर्गत ठाणे ते दिवा पाचवा-सहावा मार्गाचे काम सुरू असून गोरेगावपर्यंत झालेली हार्बर रेल्वे प्रवाशांच्या सेवेत आलेली नाही.

एमयूटीपी ३-ए अंतर्गत जवळपास ४९ हजार ५२४ कोटी रुपयांचे विविध प्रकल्प तयार करण्यात आले आहेत. सध्या हार्बर गोरेगावपर्यंत बनली असून तिचा विस्तार बोरिवलीपर्यंत करण्यात येणार आहे. त्यामुळे बोरिवलीपर्यंतच्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. बोरिवली आणि विरारमधीलही लोकल प्रवास सुकर करण्यासाठी पाचवा-सहावा मार्ग बांधण्यात येणार आहे. बोरिवलीपर्यंतच्या हार्बर विस्तारासाठी ८४६ कोटी रुपये आणि बोरिवली ते विरार पाचवा-सहावा मार्गासाठी दोन हजार २४१ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. मध्य रेल्वेवरील कल्याण ते बदलापूर, आसनगावपर्यंतच्या प्रवाशांचा प्रवासही जलद आणि सुकर करण्यासाठी योजना आखण्यात आली आहे. कल्याण ते बदलापूरसाठी तिसरा आणि चौथा मार्ग, कल्याण ते आसनगावसाठी चौथा मार्गाची योजना असून त्यामुळे लांब पल्ल्याच्या गाडय़ांना स्वतंत्र मार्गही उपलब्ध होणार आहे. हार्बरवर लोकल फेऱ्या वाढवण्यासाठी सीबीटीसी प्रकल्प, स्थानकांत सुधारणा, लोकल गाडय़ांची दुरुस्ती इत्यादी प्रकल्पांचाही समावेश करण्यात आला आहे.

वातानुकूलित लोकलमधे प्रथम आणि द्वितीय श्रेणी

पश्चिम रेल्वे मार्गावर सध्या एक वातानुकूलित लोकल गाडी धावत असतानाच मुंबई उपनगरीय रेल्वेवर नवीन प्रकल्पांसाठी २१० वातानुकूलित लोकल गाडय़ा आणण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

या नियोजनाची माहिती एमआरव्हीसी, पश्चिम आणि मध्य रेल्वेकडून रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांना शुक्रवारी झालेल्या बैठकीत देण्यात आली.

त्यावेळी या लोकल गाडय़ांमध्ये प्रथम आणि द्वितीय श्रेणी अशी विभागणी करण्याचे सांगतानाच तिकीट दरही कमी आकारणी करण्याची सूचना केली आहे. सध्या धावत असलेल्या वातानुकूलित लोकल गाडीमध्येही अशा प्रकारची सुविधा देण्यात येते का, याची चाचपणी रेल्वेकडून केली जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

 

एमयूटीपी ३ ए मधील महत्त्वाचे प्रकल्प

प्रकल्प                                                                                      खर्च

सीएसएमटी ते पनवेल जलद उन्नत मार्ग                                 १२,३३१ कोटी

पनवेल ते विरार उपनगरीय रेल्वे मार्ग                                      ७,०७२ कोटी

हार्बर विस्तार-गोरेगाव ते बोरिवली                                           ८४६ कोटी

बोरिवली ते विरार ५ वा आणि ६ वा मार्ग                                   २,२४१ कोटी

कल्याण ते आसनगाव चौथा मार्ग                                            १,७९५ कोटी

कल्याण ते बदलापूर तिसरा आणि चौथा मार्ग                          १,४१४ कोटी

सीबीटीसी हार्बर मार्ग                                                              १,३९१ कोटी

१५ रेल्वे स्थानकांत सुधारणा                                                   ९४६ कोटी

प्रकल्पांचे सादरीकरण केल्यानंतर त्यात येणारे अडथळे, खर्च इत्यादीवर एमआरव्हीसी अधिकारी आणि रेल्वे बोर्ड अध्यक्ष अश्विनी लोहाणी यांच्यात चर्चा झाली. त्यामध्ये प्रकल्पांना गती देण्यासाठी संपूर्ण सहकार्य करण्यात येईल, असे आश्वासन लोहाणी यांच्याकडून देण्यात आले.