अन्यायकारक रितीने राबविला जाणारा एखादा प्रकल्प असो वा दुष्काळासारखी नैसर्गिक आपत्ती. त्यात भरडला जातो तो अगदी व्यवस्थेच्या तळाशी असणारा शेतकरी. मराठवाडय़ातील शेतकरी सध्या भीषण दुष्काळाचा सामना करीत आहेत. त्यांच्यावर कोसळलेल्या आस्मानी संकटाची जाणीव असलेल्या मलंग गड पट्टय़ातील शेतकऱ्यांनी यथाशक्ती वर्गणी गोळा करून ५० हजार रूपयांची मदत गोळा केली आहे.
अंबरनाथ तालुक्यातील मलंग गड परिसरातील गावांमधील शेतकरी सध्या प्रस्तावीत कुशिवली धरण तसेच एमआयडीसीसाठी अन्यायकारकपणे केल्या जात असलेल्या जमीन संपादनाविरूद्ध लढा देत आहेत. शुक्रवारी अंबरनाथ तालुक्यातील नेवाळी फाटा येथे या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. कुशिवली, आंभे, खरड, ढोके, मांगरूळ, काकडवाल, गोरपे, शिरवली, काकोळे आदी मलंग गड परिसरातील शेतकरी सभेला हजर होते. सिंचनासाठी धरणाचा प्रकल्प राबविणारे शासन एमआयडीसीसाठी जागा ताब्यात घेऊन आपल्या भूमीहीन करणार असेल, तर पण हा जलसाठा कुणासाठी असा सवाल येथील शेतकऱ्यांचा सवाल आहे. त्यामुळे सध्या येथील शेतकऱ्यांनी दोन्ही प्रकल्पांना विरोध केला आहे.