21 September 2020

News Flash

झाडे खिळेमुक्त करणारी ‘आंघोळीची गोळी’

राज्यभरात ५ हजार झाडांमधून ५० हजार खिळे काढले

(संग्रहित छायाचित्र)

राज्यभरात ५ हजार झाडांमधून ५० हजार खिळे काढले

नमिता धुरी, मुंबई

झाडांना वेदनाही होतात, हे विसाव्या शतकात भारतीय शास्त्रज्ञ जगदीशचंद्र बोस यांनी सिद्ध केले होते. तरीही झाडांबाबतची संवेदनशीलता आजही आपल्यात हवी तशी रुजलेली नाही. मात्र महाराष्ट्रातील काही तरुणांना झाडांच्या वेदना जाणवल्या. त्यांच्या ‘अंघोळीची गोळी’ या संस्थेने वर्षभरात शेकडो झाडे खिळेमुक्त केली आहेत.

गेल्या वर्षी १ एप्रिलपासून ‘आंघोळीची गोळी’ या संस्थेने राज्यभरातील झाडे खिळेमुक्त करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. नजर लागू नये या अंधश्रद्धेपोटी झाडाला लिंबू आणि खिळे किंवा घोडय़ाची नाल ठोकली जाते. विविध राजकीय पक्षांचे तसेच जाहिरातींचे बॅनर्स लावण्यासाठीही खिळे ठोकले जातात. काही वेळा फेरीवाले आपल्या वस्तू टांगण्यासाठी किंवा छप्पर बांधण्यासाठी खिळे ठोकतात. यामुळे झाडांच्या आरोग्यावर परिणाम होतो. आतापर्यंत संस्थेने मुंबईतील १ हजार झाडांमधून ५ हजार खिळे काढले  आहेत. तर राज्यभरातील एकूण ५ हजार झाडांमधून ५० हजार खिळे काढले आहेत. झाडांचे खिळे काढले की संस्थेचे काम संपत नाही. तर जिथून खिळे काढले त्या ठिकाणी मेण लावले जाते, जेणेकरून वाळवी आणि इतर किडे लागू नयेत.

‘झाडांना खिळे ठोकल्याने त्यांच्या मज्जासंस्थेला हानी पोहोचते. माणसाच्या शरीरात जसे रक्त असते तसेच झाडांमध्येही एक प्रकारचा द्रवपदार्थ असतो. खिळे ठोकल्याने तो द्रव आणि इतर पोषक घटक यांच्या अभिसरणात अडथळा येतो. त्यामुळे झाडांच्या प्रत्येक अवयवापर्यंत पुरेसे अन्न पोहोचत नाही. तसेच बाहेरील इतर विषारी घटक झाडांच्या शरीरात प्रवेश करतात आणि त्यांचे आयुष्यमान खुंटते.

दोन वर्षांपूर्वी मुलुंड-गोरेगाव लिंक रोडवर एका कंपनीने खिळे ठोकून अनेक झाडांना मारले होते,’ अशी माहिती वनशक्तीचे स्टॅलिन यांनी दिली. भारतीय विज्ञान संस्थेच्या अहवालानुसार १९७० साली मुंबईचे हरित क्षेत्र ३५ टक्क्यांहून अधिक होते. मात्र आता ते १३ टक्क्यांपेक्षा कमी उरले आहे. नागरिकांना प्राणवायूचा पुरवठा होण्यासाठी हरित क्षेत्राचे प्रमाण किमान ३३ टक्के असणे आवश्यक आहे.

खिळेमुक्त झाडे उपक्रम राबवणाऱ्या तरुणांना काही ठिकाणी अतिशय धक्कादायक अनुभव येतात. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे एका झाडावर ५० खिळे आढळले होते. एकदा मालाड येथे काम करताना त्यांनी २८ झाडांमधून ५०० स्टॅपलर पिन्स काढल्या होत्या.

पाणी बचतीची संकल्पना

आठवडय़ातून एक दिवस म्हणजे रविवारी आंघोळ करायची नाही आणि पाणी वाचवायचे, अशी एक साधी-सोपी कल्पना पुण्याच्या माधव पाटील यांना सुचली. ज्या भागात पाणी नाही तेथील नागरिकांच्या भावना समजून घेणे हा त्यामागील उद्देश होता. यातूनच चार वर्षांपूर्वी ‘अंघोळीची गोळी’ संस्थेची स्थापना करण्यात आली. मात्र ही संस्था पाणीबचतीपुरतीच मर्यादित राहिली नाही. त्यांनी ‘खिळेमुक्त झाडे’ उपक्रमाला सुरुवात केली.

जे झाड आपल्याला प्राणवायू, पाऊस अशा जीवनावश्यक गोष्टी पुरवते त्याची काळजी आपणच घेतली पाहिजे. याच विचारातून आम्ही हा उपक्रम राबवीत आहोत. त्याला यश येत आहे. वसई-विरार महापालिका आणि पिंपरी-चिंचवड महापालिके ने अध्यादेश काढून झाडांना खिळे ठोकणाऱ्यांना २ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.

– तुषार वारंग, मुंबई जिल्हा समन्वयक, अंघोळीची गोळी

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 5, 2019 1:17 am

Web Title: 50 thousand nails removed from 5000 trees across maharashtra state
Next Stories
1 ‘एनबीए’ श्रेणीसाठी चार वर्षांची मुभा
2 आर्थिक मागासांना राज्यात १० टक्के आरक्षण
3 ‘मुद्रांक शुल्क अभय योजने’स मान्यता
Just Now!
X