पनवेल मतदारसंघात शहरी मतदारांच्या हाती उमेदवाराचे भवितव्य असल्याने खारघर, खांदेश्वर आणि पनवेल शहरामध्ये मतदारांच्या स्लिपांसहित पाचशे आणि हजार रुपयांची पाकिटे पोलिसांनी जप्त केली. विविध छाप्यात पोलिसांनी ३ लाख ६८ हजार ५०० रुपये जप्त केले आहेत. विशेष म्हणजे भाजपचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी लक्ष्मीदर्शनाचे भाकीत जाहीर सभेत केले होते.
खारघरमध्ये पहाटे साडेतीन वाजता स्कॉर्पिओ मोटारीतून भरणीकुमार व्यंकटेशराव शेलगुल्ला, समध गुलाम फवकी यांना अडीच लाख रुपयांसहित अटक केली. ५०० रुपयांची पाकिटे भरून भरणीकुमार व समध हे सेक्टर २० येथून जात असताना त्यांना पोलीस उपनिरीक्षक भूषण पाटील यांच्या पथकाने पकडले. या पाकिटांमध्ये संबंधित राष्ट्रीय पक्षाच्या उमेदवाराचे प्रसिद्धीपत्रक आणि मतदारांच्या नावाच्या स्लिपा होत्या. संबंधित स्कॉर्पिओ मोटार ठाकूर इन्फ्रा. कंपनीच्या नावावर असल्याची माहिती सहायक पोलीस आयुक्त शेषराव सूर्यवंशी यांनी दिली. माजी खासदार रामशेठ ठाकूर यांचे पुत्र प्रशांत ठाकूर हे भाजपच्या वतीने निवडणूक लढवत आहेत. रविवारी दुपारी नवीन पनवेल येथील सेक्टर १२ येथे सचिन रमन पाटील, भूषण दामोदर भोईर यांना ५०० रुपयांची पाकिटे आणि मतदारांच्या स्लिपांसहित पकडले. सचिन व भूषण हे दोघेही पायी चालत असून त्यांच्याकडे पाकिटे असल्याची माहिती एका जागरूक मतदाराने पोलिसांना दिल्यानंतर ही कारवाई केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक जे. आर. थोरात यांनी दिली. याबाबत खांदेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचदरम्यान सायंकाळी नवीन पनवेल पोलीस ठाण्यातील एका पोलिसाने पनवेल शहरातील अशोकबाग परिसरातून दुचाकीवरून जाणाऱ्या प्रकाश कांबरे, रोहीत यादव या दुकलीकडून अशाच प्रकारची १०४ पांढऱ्या रंगाची पाकिटे जप्त केली. यात प्रत्येकी एक हजार रुपयांच्या नोटा भरल्या होत्या. एक लाख चार हजार रुपये आणि प्रकाश व रोहीत यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. हे दोघेही साईनगर परिसरात जात होते.