रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग जोडणार ; एकनाथ शिंदे यांची घोषणा

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विदर्भाला द्रुतगती महामार्गाने मुंबई व उर्वरित महाराष्ट्राशी जोडण्यासाठी हाती घेतलेल्या समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर शिवसेनेला साथ देणाऱ्या कोकणासाठी  मुंबई ते गोव्यापर्यंत ५०० किलोमीटर लांबीचा कोकण द्रुतगती महामार्ग बांधण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. याआधीही कोकणासाठीच्या सागरी मार्गाचे प्रयत्न झाले. पण अद्याप त्यास यश आलेले नसून शिवसेनेसाठी राजकीयदृष्टय़ा महत्त्वाचा हा प्रकल्प आता तरी मार्गी लागतो का याकडे साऱ्यांचे लक्ष असणार आहे.

शिवडी-न्हावाशेवा सागरी सेतू रायगडमधील ज्या चिर्ले येथे संपतो तेथून ते सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील गोवा सीमेवरील पाथरादेवीपर्यंत ५०० किलोमीटरचा हा कोकण द्रुतगती सागरी महामार्ग असेल, अशी घोषणा सार्वजनिक बांधकाम (उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी विधानसभेत केली. भाजप सरकारचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विदर्भाचे होते. भाजपने विदर्भाला साथ दिल्यानंतर तेथील विकासासाठी त्यांनी समृद्धी महामार्गाचा प्रकल्प हाती घेतला होता. राष्ट्रवादी कॉंग्रेसने आधी त्यावर प्रश्न उपस्थित करत आक्षेप घेतल्यानंतरही फडणवीस यांनी तो प्रकल्प रेटला. आता महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पक्षाला साथ देणाऱ्या कोकणासाठी शिवसेना काम करत असल्याचा संदेश देण्यासाठी या कोकण द्रुतगती महामार्गाच्या प्रकल्पाचा निर्णय घेतला आहे.

समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर कोकणातील रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्य़ांना एकमेकांशी व मुंबईशी जोडणारा द्रुतगती महामार्ग बांधण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. रायगडमधील चिर्ले येथून सिंधुदुर्गातील पाथरादेवीपर्यंत असा ५०० किलोमीटरचा हा महामार्ग असेल. तो कोकणच्या किनारपट्टीलगत असेल. त्यामुळे पर्यटन, कृषी उद्योगाला चालना मिळेल व रोजगार वाढण्यास मदत होईल. हा महामार्ग किनारपट्टी लगत बांधताना त्यामुळे किनाऱ्यावरील पर्यावरणाचे व कोकणातील निसर्गसौंदर्याचे नुकसान होणार नाही याची काळजी घेतली जाईल, असे एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत जाहीर केले. राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत याचा तांत्रिक व आर्थिक सुसाध्यता अहवाल तयार करण्यास सांगितल्याची माहिती शिंदे यांनी दिली.

अर्थसंकल्पात रेवस ते रेड्डी या नियोजित सागरी महामार्गाचा उल्लेख केला होता. सागरी महामार्गाच्या बांधकामासाठी तीन हजार कोटी रुपये लागतील व हा प्रकल्प तीन वर्षांत पूर्ण करण्याचा सरकारचा विचार आहे, असे जाहीर केले होते. बाणकोट, केळशी, दाभोळ, जयगड येथील खाडीवर पूल बांधून या महामार्गाचे कॉंक्रिटीकरण करण्यात येईल, असेही अजित पवार म्हणाले होते.