नागरिकांनी खड्डय़ांची तक्रार केल्यानंतरही २४ तासांत खड्डा बुजवला गेला नाही तर देण्यात येणारी ५०० रुपये बक्षिसाची रक्कम पालिका अधिकाऱ्यांच्या व कंत्राटदारांच्या खिशातून दिली जाईल, असे प्रशासनाने शुक्रवारी स्पष्ट केले. खड्डे दाखवून दिले म्हणून बक्षीसपात्र रक्कम करदात्यांच्या खिशातून का द्यायची असा सवाल करत शुक्रवारी स्थायी समितीत सदस्यांनी पालिका प्रशासनाला धारेवर धरले. त्यावर पालिकेने हा खुलासा केला.

पालिकेने मुंबईत १ नोव्हेंबरपासून ‘खड्डे दाखवा आणि ५०० रुपयाचे बक्षीस मिळवा’ अशी योजना आणली आहे. पालिकेच्या अ‍ॅपवर तक्रार नोंदवल्यानंतर २४ तासांत खड्डा बुजवला गेला नाही तर तक्रारदाराला ५०० रुपये मिळणार आहेत. याबाबतचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर शुक्रवारी स्थायी समितीच्या बैठकीत तीव्र पडसाद उमटले. विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी प्रशासनाच्या या अनोख्या योजनेबद्दल हरकतीचा मुद्दा उपस्थित केला. सर्व पक्षीय नगरसेवकांनी प्रशासनाच्या या धोरणाची खिल्ली उडवली. ५०० रुपयांचे बक्षीस देण्यासाठी पालिकेने अर्थसंकल्पात त्याकरिता तरतूद केली आहे का, करदात्यांचा पैसा असा परस्पर कसा काय देता, अशी प्रश्नांची सरबत्ती केली. त्यावर स्पष्टीकरण देताना अतिरिक्त आयुक्त प्रवीण दराडे यांनी बक्षिसाची रक्कम संबंधित पालिका अधिकाऱ्यांच्या खिशातून देण्याचे स्पष्ट केले.

रस्ते कामाची जबाबदारी तीन यंत्रणांवर असते. मध्यवर्ती यंत्रणा – रस्ते विभाग, वॉर्ड कार्यालय आणि दोष दायित्व कालावधीतील रस्त्यांचे कंत्राटदार यांच्यावर ही जबाबदारी असते. यामुळे २४ तासांत खड्डा न बुजवल्यास मध्यवर्ती यंत्रणेतील रस्ते विभागाचे कार्यकारी अभियंता, वॉर्डचे साहाय्यक आयुक्त आणि संबंधित कंत्राटदारावर यांना आपल्या खिशातून बक्षिसाचे ५०० रुपये दिले जातील, असे पालिका प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. दरवर्षी खड्डे भरण्याचे काम ऑक्टोबपर्यंत पूर्ण होते. मग या वर्षी नोव्हेंबरमध्ये ही योजना आणली म्हणजे अनेक ठिकाणी रस्त्यांवरचे खड्डे बुजवलेले नाहीत हे प्रशासनाने मान्य केले आहे, असा टोला रवी राजा यांनी लगावला. खड्डे बुजवण्यासाठी अर्थसंकल्पात ८० कोटींची तरतूद केली होती. तरीही खड्डे का बुजले नाहीत, असा सवाल त्यांनी केला. अ‍ॅपवर तक्रार करणाऱ्यांच्याच तक्रारी सोडवल्या जातात. मग विभाग कार्यालयात जाऊन तक्रार करणाऱ्या सर्वसामान्य तक्रारदारांच्या तक्रारींची दखल घेणार की नाही, असा सवाल नगरसेवक आसिफ झकेरिया यांनी केला.

शिवसेनेचीही नाराजी

या वेळी शिवसेनेच्या सुजाता पाटेकर, रमेश कोरगावकर, किशोरी पेडणेकर, भाजपचे प्रभाकर शिंदे, राष्ट्रवादीच्या राखी जाधव, काँग्रेसचे जावेद जुनेजा यांनीदेखील पालिका प्रशासनाला धारेवर धरले. एक फूट लांब आणि तीन इंच खोल खड्डा दाखवल्यास बक्षीस देणार, मग छोटे खड्डे बुजवणार नाही का असा सवालही या वेळी उपस्थित केला. पालिका प्रशासन महापौर, महासभा, स्थायी समिती, नगरसेवकांना विश्वासात न घेता अशी योजना थेट का राबवते असा सवाल अध्यक्ष यशवंत जाधव यांनी विचारला.