देशभरातील ६० रुग्णालयांमध्ये पुरवठा

मुंबई:  देशभरात सध्या जाणवणाऱ्या प्राणवायूच्या तुटवडय़ावर मात करण्यासाठी ‘टाटा मेमोरियल रुग्णालया’ने पुढाकार घेतला असून मागील दोन आठवडय़ांत देशभरातील २५ शहरांमधील ६० रुग्णालयांना सुमारे पाच हजार ‘ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर’ उपलब्ध करून दिले आहेत.

दोन आठवडय़ापूर्वी कॅलिफोर्नियातील एका संस्थेला ७३ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर भारताला दान करायचे असल्याचे समजल्यावर डॉ. नरेश रामराजन यांनी टाटा मेमोरियल संस्थेला देण्याचे सूचित केले. त्यानंतर काही तासांतच आसाम येथील टाटा मेमोरियल रुग्णालयात हे कॉन्सन्ट्रेटर पाठविले गेले. वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य व्यवस्थेवर आलेला ताण आणि प्राणवायूची मोठय़ा प्रमाणातील कमतरता दूर करून रुग्णांचा जीव वाचविण्यासाठी कॉन्सन्ट्रेटर पुरविण्याच्या मोहिमेला इथूनच  टाटा मेमोरियल रुग्णालयाने सुरुवात केली.

यासाठी आवश्यक आर्थिक निधी कसा उभारायचा, कोणत्या प्रकारचे कॉन्सन्ट्रेटर खरेदी करायचे, विमानसेवेच्या माध्यमातून उपलब्ध कसे करायचे, कोणत्या रुग्णालयांना द्यायचे हे सर्व टप्पे पार पाडण्यासाठी रुग्णालयाचा एक चमू सज्ज झाला. रात्रंदिवस काम करून ही सर्व प्रक्रिया पार पाडत केवळ १० दिवसांत रुग्णालयाने देशातील ६० रुग्णालयांकरिता सुमारे पाच हजार कॉन्सन्ट्रेटर उपलब्ध के ले आहेत. रविवारी सकाळीच ३ हजार ४०० कॉन्सन्ट्रेटर आणि तीन लाख एन ९५ मास्क असे सुमारे ८१ हजार किलोची वैद्यकीय सामग्री मुंबईत टाटा रुग्णालयासाठी पोहोचली असून याचा पुरवठा देशभरात केला जाणार आहे. मागील दोन आठवडय़ांत हा पुरवठा विविध ठिकाणांहून मागविण्यासाठी एअर इंडियाने पुढाकार दर्शविला असल्यामुळे हे सामान खरेदी करणे आणि देशभरात पोहचविणे शक्य झाले असल्याचे टाटा रुग्णालयाचे डॉ. चतुर्वेदी यांनी सांगितले.

न्यूयॉर्क प्रेसबेटेरियन रुग्णालयाच्या मदतीने सुमारे २९०० कॉन्सन्ट्रेटर भारताला प्राप्त झाले आहेत, तर टाटा रुग्णालयाच्या ‘नव्या केअर’ उपक्रमाच्या माध्यमातून टुगेदर फॉर इंडिया ही मोहीम सुरू केली गेली.

यातून विविध देशांमधून १४५ दात्यांकडून सुमारे १८ कोटी रुपये ४८ तासांत उभारले गेले.

राज्यात टाटा मेमोरियल रुग्णालयासह केईएम, शीव रुग्णालय, बीएआरसी रुग्णालय, जे.जे. रुग्णालय, सिडको करोना केंद्र, उपजिल्हा रुग्णालय पनवेल, कळंबोली करोना रुग्णालय, प्रमोद महाजन करोना रुग्णालय, मीरा भाईंदर महानगरपालिका इत्यादी रुग्णालयांमध्ये कॉन्स्नट्रेटर बसविले आहेत. यासह पंजाब, उत्तरप्रदेश, बिहार, दिल्ली, आसाम, मध्यप्रदेश, मिझारोम, पश्चिम बंगाल, आंध्रप्रदेश, कर्नाटक, गुजरात, राजस्थान, केरळ आणि तमिळनाडू या राज्यांमधील रुग्णालयांची यासाठी निवड केली आहे.

टाटा ट्रस्टसह अनेक सामाजिक संस्थांनी हे कॉन्स्नट्रेटर खरेदी करण्यासाठी मदत केली. आंतरराष्ट्रीय पातळीवर वैद्यकीय क्षेत्रातील अनेक मंडळींनी पुढाकार घेतला. यासह टाटा रुग्णालयातील चमूने कंपन्यांपासून रुग्णालयांपर्यंत कॉन्सन्ट्रेटर पोहचविण्याची जबाबदारी खंबीरपणे उचलल्यामुळेच अगदी कमी कालावधीत हे करणे शक्य झाले असे टाटा मेमोरिय सेंटरचे संचालक डॉ. राजेंद्र बडवे यांनी सांगितले.

रुग्णालयांची निवड करणे हेही आव्हानात्मक होते. प्राणवायू साठा करण्यासह पाईपद्वारे प्राणवायूचा पुरवठा करण्याची सुविधा उपलब्ध नाही अशा रुग्णालयांचा विचार प्राधान्याने केला गेला. तसेच रुग्णालयांना खरच कॉन्सन्ट्रेटरची किती आवश्यकता आहे, रुग्णांलयाची प्राणवायूची गरज किती आहे याचा अभ्यास केला गेला. त्यानंतरच यांची निवड केली गेली. कॉन्स्नट्रेटरचा वापर योग्यरितीने केला जावा यासाठी किती रुग्णांना फायदा झाला याचा पाठपुरावा केले जाणार आहे.

 – डॉ. सी. एस. प्रमेश, टाटा मेमोरियल रुग्णालयाचे संचालक 

रुग्णालयांची निवड करणे हेही आव्हानात्मक होते. प्राणवायू साठा करण्यासह पाईपद्वारे प्राणवायूचा पुरवठा करण्याची सुविधा उपलब्ध नाही अशा रुग्णालयांचा विचार प्राधान्याने केला गेला. तसेच रुग्णालयांना खरेच कॉन्सन्ट्रेटरची किती आवश्यकता आहे, रुग्णांलयाची प्राणवायूची गरज किती आहे याचा अभ्यास केला गेला. त्यानंतरच यांची निवड केली गेली. कॉन्सन्ट्रेटरचा वापर योग्यरितीने केला जावा यासाठी किती रुग्णांना फायदा झाला याचा पाठपुरावा केला जाणार आहे.

 – डॉ. सी. एस. प्रमेश, टाटा मेमोरियल रुग्णालयाचे संचालक