प्रकल्पाआड येणाऱ्या पाच हजार झाडांवर कुऱ्हाड अटळ

कुलाबा-सीप्झ मेट्रो-३ प्रकल्पामुळे वाहतूक समस्येवर तोडगा निघणार असला तरी पर्यावरणाच्या दृष्टीने हा प्रकल्प घातकच ठरण्याची शक्यता अधिक आहे. संपूर्ण प्रकल्पामुळे ५ हजारांहून झाडे बाधित होणार असून येथील स्थानिक रहिवाशांनी याला तीव्र विरोध करण्याचा निर्धार केला आहे. कारण या परिसरातून तुटणारी झाडे ही अत्यंत दुर्मीळ व किमान १०० वर्षे इतकी जुनी असून मुंबई शहरातून ही झाडे हद्दपार झाल्यास अशी झाडे शहरात पुन्हा दिसणार नाहीत. सध्या उच्च न्यायालयाने झाडे तोडण्यावर स्थगिती दिली असली तरी मेट्रो प्रकल्प होणारच असल्याने या झाडांवर टांगती तलवार कायम राहणार आहे.

मुंबईत मेट्रो-३ प्रकल्पामुळे पर्यावरणाच्या एकंदर होणाऱ्या नुकसानीचा अंदाज घेतला तर त्यामुळे मुंबईतील मोठा हरित पट्टा बाधित होणार असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळेच पर्यावरणवादी या प्रकल्पाविरोधात उतरले असून ज्या भागातून ही मेट्रो जाणार आहे, तेथील स्थानिक रहिवाशांनीदेखील या प्रकल्पाविरोधात शड्डू ठोकला आहे. कारण या प्रकल्पामुळे बाधित होणारे वृक्ष हे १०० वर्षांहून जुने असून त्यांची तोड झाल्यास ते पुन्हा शहरात उगवणे शक्य नसल्याचे पर्यावरणवाद्यांचे मत आहे. तसेच मेट्रो-३ प्रकल्पासाठी २०१२ मध्ये करण्यात आलेल्या अहवालात जवळपास २ हजार २४१ झाडे तुटणार असल्याचे अहवालात स्पष्ट करण्यात आले होते. मात्र सध्या ५ हजार १२ झाडे बाधित होणार असल्याचे सरकारी आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. यातील काही झाडे तोडण्यात येणार असून उरलेली पुनरेपित करण्यात येणार आहेत. मात्र पुनरेपित करण्यात येणारी झाडे जगत नसल्याने त्यांचाही मृत्यूच होणार आहे.

त्यामुळे हा झालेला संख्येतील बदल, तसेच झाडे वाचविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब न करता सरळ सरळ करण्यात येणारी तोड यामुळे पर्यावरणवादी व रहिवासी आक्रमक झाले आहेत.

कफ परेड तसेच चर्चगेट-नरिमन पॉइंट भागातील रहिवाशांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली असून न्यायालयानेही यातील तथ्य लक्षात घेत त्यांना दिलासा दिला आहे. या पाश्र्वभूमीवर दक्षिण मुंबईतील दादाभाई नौरोजी रस्ता, जे. टार्टर रस्ता, कफ परेड भागातील या झाडांबाबतची वस्तुस्थिती ‘लोकसत्ता’ने जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे.

दादाभाई नौरोजी रस्ता

छत्रपती शिवाजी टर्मिनस स्थानक ते हुतात्मा चौकापर्यंतची झाडे मेट्रो-३च्या कामात भक्ष्यस्थानी पडणार आहेत. या भागात पाम वृक्ष, पिंपळ, नारळ आदी प्रकारची झाडे आहेत. फार पसरट वाढलेली झाडे या रस्त्यावर नसली तरी गेल्या अनेक वर्षांपासून झाडे या रस्त्यावर आहेत. मात्र मेट्रोच्या हुतात्मा चौक स्थानकाच्या कामामुळे या रस्त्यावरील झाडे तुटणार आहेत. तसेच या रस्त्यावरील नारळ व पामची काही झाडे तोडण्यात आली आहेत. ही झाडे तुटल्याने येथे असलेली शाळा व बस थांबे येथे उभ्या राहणाऱ्या पालक व प्रवाशांच्या डोक्यावरील सावली हरपणार आहे.

जे. टार्टर रस्ता

चर्चगेट स्थानकापासून थेट एअर इंडिया इमारतीपर्यंत गेलेला हा मोठा व दक्षिण मुंबईतील महत्त्वाचा रस्ता. या रस्त्याचे वैशिष्टय़ म्हणजे या रस्त्याच्या दुतर्फा वड, पिंपळ, पाम, आंबा, बदाम आदींचे मोठे वृक्ष आहेत. यातील काही वृक्ष हे एक ते दोन फूट रुंद नव्हे तर तब्बल १० फूट इतकी रुंद आहेत. त्यामुळे या रस्त्यावर दुपारचे ऊन लागत नाहीच, मात्र मोठय़ा प्रमाणात वृक्ष असल्याने त्यांच्याकडून कायम थंडावाच मिळतो. येथील वृक्ष शंभराहून अधिक वर्षांचे असल्याचे स्थानिक रहिवाशांचे म्हणणे असून ही झाडे वाचावीत यासाठी स्थानिकांनी न्यायालयाचे दार ठोठावले आहे. येथील ९८ वृक्ष मेट्रोच्या भक्ष्यस्थानी पडणार असून त्यामुळेच येथील रहिवासी अत्यंत भावनिक झाले आहेत. इतकेच नव्हे तर या मार्गावरून दररोज चर्चगेट स्थानक गाठणाऱ्या रोजच्या प्रवाशांच्या जिव्हाळ्याचा मुद्दा येथील झाडे ठरली आहेत.

कफ परेड : कफ परेड भागातील ४० वर्षांहून जुन्या इमारतींजवळून येथील मेट्रो मार्ग जात असून येथील वृक्षांची संख्या ही पावणेतीनशेच्या आसपास आहे. येथेही तितकेच जुने वृक्ष असून येथील बहुतेक वृक्षांची तोड झाली आहे. तसेच, झाडे तोडून येथे खोदकाम सुरू करण्यात आले असून येथील इमारतीतले रहिवासी त्यामुळे भयभीत झाले आहेत. कारण इमारतींजवळ खोदकाम सुरू  झाल्याने त्यांच्या पायाला धोका पोहोचत असल्याचा दावा स्थानिक रहिवाशांनी केला आहे. त्यामुळेच येथील झाडे वाचविण्यासाठी व हे खोदकाम थांबवण्यात यावे यासाठी परवीन जहांगीर यांनी न्यायालयात धाव घेतली आहे.

मेट्रो प्रकल्पासाठी तोडण्यात येणाऱ्या झाडांबद्दल मेट्रोच्या स्पष्टीकरणात एकवाक्यता नसून २०१२ सालचा त्यांचा अहवाल व सध्याची त्यांची आकडेवारी यात तफावत आहे. सध्या बाधित होणाऱ्या झाडांचा आकडा मोठा असून यामुळे पर्यावरणाची झीज कधीही भरून येणारी नाही.

– झोरु बाथेना, पर्यावरणवादी कार्यकर्ते


मेट्रो-३ प्रकल्पामुळे बाधित झाडे

* तोडण्यात येणारी झाडे – १३३१

* पुनरेपित करण्यात येणारी झाडे – ३६८१

* एकूण झाडे – ५०१२

दक्षिण मुंबईत बाधित होणारी झाडे

तोडण्यात   येणारी झाडे      पुनरेपित करण्यात येणारी झाडे

कफ परेड                 १६१                  १०९

चर्चगेट                     ५१                    ४७

विधानभवन               ९७                 ८६

हुतात्मा चौक              ४५                 ७६