अ‍ॅपआधारित टॅक्सींशी स्पर्धा वाढूनही प्रवाशांशी अरेरावी सुरूच; गेल्या आठ महिन्यांत गैरवर्तनाच्या ५०५ तक्रारी

अ‍ॅपआधारित तसेच खासगी टॅक्सींमुळे आपला रोजगार बुडाल्याची ओरड करणाऱ्या काळीपिवळी टॅक्सीचालकांनी या टॅक्सींच्या चालकांकडून वर्तणुकीचे धडे मात्र घेतलेले नाहीत. उलट गेल्या काही वर्षांत काळीपिवळी टॅक्सीचालकांचा मुजोरपणा आणखी वाढत असल्याचे दिसून येत आहे. अशा टॅक्सीचालकांच्या अरेरावीबाबत यंदा एप्रिल महिन्यापासून तब्बल ५०५ तक्रारी आल्या आहेत.

अ‍ॅपआधारित टॅक्सीचालकांनी निर्माण केलेल्या स्पर्धेला उत्तर देण्यासाठी काळ्या-पिवळ्या टॅक्सी संघटनांनी प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी वातानुकूलित सेवा, अ‍ॅपवर आधारित सेवा अमलात आणली. मात्र प्रवाशांना टॅक्सीचालकांकडून दिली जाणारी वागणूक हा नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. खासगी अ‍ॅपची स्पर्धा निर्माण झाल्यानंतर तरी त्यात फरक पडेल अशी अपेक्षा होती. मात्र टॅक्सीचालकांकडून प्रवाशांना दिलेल्या वागणुकीत बदल होत नसल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे.

मुंबईत शहरांत ४० हजारपेक्षा जास्त काळ्या-पिवळ्या टॅक्सी धावतात. मात्र गेल्या काही वर्षांत खासगी टॅक्सींची संख्या वाढते आहे. उत्तम सेवेमुळे काळ्या-पिवळ्या टॅक्सीचालकांच्या उत्पन्नावर परिणाम होत गेला. खासगी टॅक्सी सेवांवर निर्बंध आणावे, अशी मागणीदेखील करण्यात आली आणि त्यानुसार शासनाकडून खटुआ समिती स्थापन करण्यात आली. या समितीकडून खासगी टॅक्सीबरोबरच काळ्या-पिवळ्या टॅक्सीसाठीही नियमावली तयार करून शासनाकडे तसा अहवाल सादर करण्यात आला आहे. त्यावर लवकरच निर्णय अपेक्षित आहे. तत्पूर्वी काळ्या-पिवळ्या टॅक्सी संघटनांनी प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी खासगी टॅक्सीच्या धर्तीवरच येणाऱ्या भाडय़ावर २५ टक्के जादा भाडे आकारून वातानुकूलित टॅक्सी सेवा सुरू केली. तसेच प्रवाशांना हवी तेव्हा टॅक्सी उपलब्ध व्हावी या हेतूने अ‍ॅपआधारित टॅक्सी सुविधाही सुरू करण्यात आली. परंतु यानंतरही काळ्या-पिवळ्या टॅक्सीचालकांच्या व्यवसायात फरक पडलेला नाही. याला कारण बहुधा चालकांची वर्तणूक कारणीभूत ठरते आहे.

खासगी टॅक्सींनी निर्माण केलेल्या स्पर्धेमुळे काळ्या-पिवळ्या टॅक्सीचालकांच्या वर्तवणुकीत सुधारणा झाल्याचा दावा टॅक्सी संघटनांकडून करण्यात येत आहे. मात्र आकडेवारी वेगळेच चित्र दाखवून देत आहे. प्रादेशिक परिवहन विभागाच्या ताडदेव कार्यालयाकडे आलेल्या प्रवाशांच्या तक्रारींनुसार त्यात वाढ झाल्याचे दिसून येते. एप्रिल, २०१७ ते नोव्हेंबर, २०१७ मध्ये काळ्या-पिवळ्या टॅक्सीचालकांविरोधात तब्बल ५०५ तक्रारी दाखल झाल्या. एप्रिल २०१६ ते मार्च २०१७ मध्ये या तक्रारींची संख्या ३३३ एवढी होती. म्हणजे या वर्षी अवघ्या आठ महिन्यांत ५००हून अधिक तक्रारी दाखल झाल्या आहेत.

या तक्रारीनंतर आरटीओकडून तात्काळ कारवाई करण्यात आली. त्यात १७९ चालकांचे टॅक्सी परवान्यांचे आणि १६१ चालक परवान्यांचे निलंबन करण्यात आले.

तसेच पाच लाख ४६ हजार ४०० रुपये तडजोड शुल्क वसूल करण्यात आले. तर एप्रिल, २०१७ ते नोव्हेंबर, २०१७ मध्ये २९४ जणांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. या तक्रारींमध्ये जादा भाडे वसूल करणे, भाडे नाकारणे, बेदरकारपणे वाहन चालविणे अशा तक्रारींचा समावेश असल्याची माहिती आरटीओकडून देण्यात आली.

काळ्या-पिवळ्या टॅक्सीचालकाची वर्तणूक खराब होण्याची अनेक कारणे आहे. मुंबईतील १६०० टॅक्सी स्टॅण्ड असून नसल्यासारखे आहेत. या स्टॅण्डवर खासगी वाहने थांबतात आणि टॅक्सीला कुठेतरी बाजूला उभे राहावे लागते. त्याच वेळी वाहतूक पोलिसांकडून नो पार्किंग किंवा दुहेरी पार्किंगचा दंड आकारला जातो. याचा राग प्रवाशांवर निघतो. अनेकदा चालक घरी किंवा इंधन भरण्यासाठी जात असेल तेव्हाही प्रवासी वाहन थांबवण्याचा प्रयत्न करतात. मात्र न थांबल्यास किंवा त्याचे कारण दिल्यावर तक्रार केली जाते. 

– ए. एल. क्वाड्रोस, महासचिव, मुंबई टॅक्सीमेन्स युनियन