मुंबईत करोनाचे ५१० नवे रुग्ण आढळले आहेत. तर करोनाची लागण झाल्याने १८ जणांचा मृत्यू झाला आहे. नवे रुग्ण आढळल्याने मुंबईतील करोनाग्रस्ताची संख्या ९ हजार १२३ इतकी झाली आहे. करोनाची लागण होऊन आत्तापर्यंत एकट्या मुंबईत ३६१ जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबई महापालिकेने ही माहिती दिली आहे.

धारावीत ६३२ रुग्ण
मुंबईतल्या धारावीत ४२ नवे करोना रुग्ण आढळले. त्यामुळे धारावीची रुग्णसंख्या ही ६३२ इतकी झाली आहे. आत्तापर्यंत मुंबईतल्या धारावीत २० जणांचा मृत्यू करोनाची लागण झाल्याने झाला आहे. ही माहितीही मुंबई महापालिकेनेच दिली आहे.

मुंबईतल्या धारावीत करोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. त्या दृष्टीने विशेष काळजी घेतली जाते आहे. दरम्यान मे महिन्याच्या अखेरपर्यंत राज्याच्या बहुतांश भागात ग्रीन झोन दिसला पाहिजे त्यादृष्टीने कामाला लागा असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.

काय म्हटलं आहे उद्धव ठाकरेंनी ?
अर्थचक्रही सुरु राहिले पाहिजे म्हणून आपण काही प्रमाणात झोन नुसार शिथिलता आणली पण याचा अर्थ लॉकडाउनमधून मोकळीक मिळाली असे नाही. विभागीय आयुक्त ,जिल्हाधिकारी, पालिका आयुक्त , पोलीस यांनी कोणत्याही परिस्थितीत लॉकडाउनची कडक अमलबजावणी करून आपापले क्षेत्र लवकरात लवकर ग्रीन झोन्स मध्ये कसे येतील ते पाहावे. जिल्हाधिकाऱ्यांनी स्थानिक परिस्थितीनुरूप प्रसंगी योग्य तो निर्णय घ्यावा पण अमलबजावणीत कुचराई करू नये असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये दिले.