घाटकोपरमधील माणिकलाल परिसरात बांधकाम सुरु असलेल्या इमारतीच्या आवारात चार्टर्ड विमान कोसळल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला असून हे विमान यू वाय अॅव्हिएशन या कंपनीचे होते. मानिक मारिया झुबेर, सहवैमानिक प्रदीप राजपूत, तंत्रज्ञ सुरभी आणि मनीष पांडे या चार जणांचा मृत्यू झाला. तर पादचारी गोविंद पंडित यांचाही दुर्दैवी अंत झाला. या घटनेनंतर मागील सात वर्षांकडे नजर टाकली तर विमान अपघाताच्या एकूण ५२ घटना घडल्याचे समोर येते आहे.

Directorate of Air Safety, DGCA दिलेल्या माहितीनुसार २०११ ते २०१७ या कालावधीत एकूण ५२ अपघात झाल्याचे समोर आले आहे. देशभरात घडलेल्या अपघातांची ही आकडेवारी आहे. गंभीर अपघाताच्या एकूण ४५ घटना घडल्या आहेत. २०११ या वर्षात अपघाताच्या ११ घटना घडल्या. २०१२ मध्ये ९ घटना घडल्या, २०१३ मध्ये ८ घटना घडल्या. २०१४ मध्ये ६ अपघात घडले. २०१५ मध्ये १० अपघात झाले. २०१६ मध्ये ७ अपघात झाले तर २०१७ मध्ये १ अपघात झाला. ही आकडेवारी लक्षात घेतली तर या सगळ्या अपघातांची एकूण संख्या ५२ होते. किरकोळ अपघात आणि गंभीर अपघातांची ही देशभरातली आकडेवारी आहे.

गंभीर अपघातांवर एक नजर
२०११-५ विमान अपघात
२०१२-७ विमान अपघात
२०१३ -६ विमान अपघात
२०१४- ११ विमान अपघात
२०१५- ५ विमान अपघात
२०१६-११ विमान अपघात

एकंदरीतच या अपघातांवर नजर टाकली तर देशात घडलेल्या विमान अपघातांची संख्या निश्चितच मोठी आहे. ते कसे टाळायचे? त्यावर काय उपाययोजना करायच्या हे पाहणे केंद्र सरकारपुढचे मोठे आव्हान असणार आहे.