|| अक्षय मांडवकर

शिकारीत बळी गेलेल्यांची संख्या अधिक; बिबटय़ांच्या शिकारीच्या घटनांत महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी

गेल्या सहा महिन्यांमध्ये राज्यात ५२ बिबटय़ांचा मृत्यू झाला असून त्यापैकी १७ बिबटय़ांचा बळी शिकारीत गेला आहे. बिबटय़ांचा शिकारीत बिबटय़ांच्या संख्येत महाराष्ट्र देशात दुसऱ्या स्थानावर आहे. याच काळात देशात २८५ बिबटे मृत्युमुखी पडले आहेत. ‘वाइल्डलाइफ प्रोटेक्शन सोसायटी ऑफ इंडिया’ (डब्लूपीसीआय) या वन्यजीवांवर काम करणाऱ्या संस्थेकडून ही आकडेवारी गोळा करण्यात आली आहे.

बिबटय़ा संवर्धनासाठी वनविभागाकडून राबविण्यात येणारे विविध प्रकल्प आणि मोहिमा निष्प्रभ ठरत असल्याचे समोर आले आहे. गेल्या सहा महिन्यांत राज्यात ५२ बिबटे मृत्युमुखी पडले आहेत. मुख्य म्हणजे यामध्ये शिकारीसाठी मारलेल्या बिबटय़ांची संख्या १७ असून नैसर्गिक कारणास्तव मृत्यू झालेल्या बिबटय़ांची संख्या १६ आहे. याच कालावधीत संपूर्ण देशात मृत झालेल्या २८५ बिबटय़ांपैकी ९८ बिबटय़ांची शिकार झाल्याची माहिती ‘डब्लूपीसीआय’ या संस्थेने प्रसिद्ध केली आहे. ही संस्था वनविभागाशी संलग्नित राहून वन्यजीवांच्या संवर्धनाचे काम करते. तसेच देशात मृत्युमुखी पडणाऱ्या वन्यजीवांचे विशेषत: वाघ आणि बिबटय़ांसारख्या प्राण्यांच्या माहितीचे संकलन करून वन्यजीव गुन्ह्य़ांच्या नोंदी ठेवण्याचे काम करते.

संस्थेकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार शिकारीकरिता मारल्या जाणाऱ्या बिबटय़ांमध्ये उत्तराखंड राज्यानंतर महाराष्ट्राचा क्रमांक लागत आहे. गेल्या सहा महिन्यांत शिकारीच्या कारणास्तव उत्तराखंड राज्यात २४ बिबटय़ांचा मृत्यू झाला असून महाराष्ट्रात १७ बिबटय़ांचा मृत्यू झाल्याचे उघड झाले आहे. त्यापाठोपाठ मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश आणि छत्तीसगढ ही राज्य आहेत.

संस्थेकडून मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातील मृत्यू झालेल्या ५२ बिबटय़ांपैकी ग्रामस्थांकडून मारल्या गेल्याची शक्यता असणाऱ्या बिबटय़ांची संख्या पाच आणि इतर वन्यजीवांबरोबर झालेल्या झटापटीमुळे तीन बिबटय़ांचा मृत्यू झाला आहे. तर रस्ते आणि रेल्वे अपघातांत ११ बिबटे मृत्युमुखी पडले आहेत.

शिवाय नैसर्गिक मृत्यूची संख्या १६ असून शिकारीसाठी मारल्या गेलेल्या १७ बिबटय़ांपैकी सहा बिबटय़ांची शिकार कातडीच्या तस्करीसाठी करण्यात आल्याची माहिती ‘डब्लूपीसीआय’चे प्रकल्प संचालक टिटो जॉसेफ यांनी दिली.

अवयवांच्या तस्करीसाठी बिबटय़ांची शिकार होत असल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्रात बिबटय़ांच्या वाढत्या शिकारीच्या घटनांना आळा घालण्यासाठी वनक्षेत्रानजीक असणाऱ्या ग्रामीण भागांमध्ये गस्तीचे प्रमाण वाढविणे गरजेचे असल्याची माहिती केंद्रीय वन्यजीव गुन्हे नियंत्रण विभागाच्या पश्चिम क्षेत्राचे प्रमुख एम. मारंको यांनी दिली. तसेच बहुतांश इतर प्राण्यांच्या शिकारीसाठी ग्रामस्थांकडून लावण्यात येणाऱ्या सापळ्यांमध्ये बिबटे सापडतात आणि त्यांचा मृत्यू होतो, असेही त्यांनी सांगितले.