गेले काही दिवस मुंबईत करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत चढ-उतार सुरू आहे. शनिवारी करोनावाढीचा दर ०.१४ टक्क्य़ांवर पोहोचला. दिवसभरात मुंबईतील ५२९ जणांना करोनाची बाधा झाली, तर सहा रुग्णांचा मृत्यू झाला.

मुंबईमध्ये करोनाबाधित रुग्णांची संख्या नियंत्रणात आल्यानंतर सर्वसामांन्य नागरिकांना मर्यादित वेळेत लोकल प्रवासाची परवानगी देण्यात आली. मात्र त्यानंतर करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत चढ-उतार होताना दिसत आहे. आतापर्यंत मुंबईतील करोनाबाधितांची संख्या तीन लाख १३ हजार ४३१ वर पोहोचली आहे. विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेणारे पाच पुरुष आणि एका महिलेचा शनिवारी करोनामुळे मृत्यू झाला. यापैकी पाच जणांना दीर्घकालीन आजार होते. आतापर्यंत मुंबईतील ११ हजार ४१३ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.

रुग्णालयांत उपचार घेणारे ५४२ रुग्ण शनिवारी करोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले. आतापर्यंत दोन लाख ९५ हजार ८८६ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. आजघडीला विविध रुग्णालयांमध्ये पाच हजार २७६ करोनाबाधित रुग्ण उपचार घेत आहेत.

मुंबईतील रुग्ण करोनामुक्त होण्याचे प्रमाण ९४ टक्क्य़ांवर स्थिर आहे, तर मुंबईतील रुग्णदुपटीचा काळ सरासरी ४९६ दिवसांपर्यंत खाली आला आहे.