संदीप आचार्य
मुंबई: मुंबईतील सर्वच्या सर्व मृत्यू आम्ही समोर आणले आहेत. आम्हाला काहीच लपवायचे नाही, असे काही दिवसांपूर्वी मुंबईतील लपलेले ८६२ मृत्यूंची माहिती जाहीर करताना मुख्य सचिव अजोय मेहता यांनी सांगितले होते. त्यानंतरही मुंबईतील वेगवेगळ्या वॉर्डातील तसेच रुग्णालयातील ५३० करोना मृत्यू समोर आले आहेत. याची गंभीर दखल घेत पालिका आयुक्त इक्बालसिंग चहा यांनी पालिकेचे सर्व अधिष्ठाता, वैद्यकीय अधीक्षक तसेच खाजगी रुग्णालयांच्या प्रमुखांना त्यांच्याकडील सर्व करोना मृत्यूंची माहिती सोमवारपर्यंत सादर करा अन्यथा कारवाईला तयार राहा असा सज्जड दम दिला आहे.

गेले काही दिवस मुंबईतील करोना मृतांची जी यादी आरोग्य विभागाकडून सादर केली जात आहे त्यामध्ये ४८ तासातील करोना मृत्यू व मागील करोना मृत्यू असे दोन स्वतंत्र मृत्यूंचे संदर्भ दिले जात आहेत. मुंबईतील ४५१ करोना मृत्यू जाहीर करण्यात आले नसल्याचे वृत्त सर्वप्रथम ‘लोकसत्ता’ उघडकीस आणल्यानंतर मुख्य सचिव अजोय मेहता यांनी आम्हाला एकही करोना मृत्यू लपवायचा नाही व दोन दिवसात मुंबईसह राज्यातील सर्व शिल्लक करोना मृत्यू जाहीर केले जातील असे सांगितले होते. त्यानुसार १६ जून रोजी राज्य सरकारने एका प्रसिद्ध पत्रकाद्वारे राज्यातील १३२८ व मुंबईतील ८६२ लपलेले करोना मृत्यू जाहीर केले. मात्र पालिकेच्या आयुक्त व अतिरिक्त आयुक्तांनी घेतलेल्या आढाव्यात वॉर्ड स्तरावर घरात झालेले तसेच छोट्या नर्सिंग होम्स मधील अनेक करोना मृत्यूंची माहितीच ‘डेथ ऑडिट कमिटी’ पुढे आली नसल्याचे उघड झाले. यामुळे पालिकेच्या ‘एपिडेमिक सेल’च्या माध्यामातून लपलेल्या करोना मृत्यूंची माहिती गोळा करण्यास सुरुवात केली. या शोध मोहीमेत नव्याने ५३० करोना मृत्यू हाती लागले असले तरी पालिकेच्या शीव, नायर, केईएमसह अन्य रुग्णालयांमधील करोना मृत्यूंची माहिती अद्यापि पूर्णपणे हाती आलेली नसल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.

आयुक्त चहेल यांनी बोलावलेल्या आजच्या बैठकीत सर्व अतिरिक्त आयुक्त, सहआयुक्त, सर्व वैद्यकीय महाविद्यालयांचे अधिष्ठाता तसेच अधिक्षक आणि टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. संजय ओक, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने व टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी आदी उपस्थित होते. या बैठकीत २० मे ते २३ मे या कालावधीत झालेल्या दैनंदिन करोना मृत्यूंच्या माहितीबरोबर केईएम, शीव व नायर सारख्या रुग्णालयातून एप्रिल व मे मधील करोना मृत्यूंची माहिती दिली गेल्याचे संबंधितांनी स्पष्ट केल्यानंतर कोणत्याही परिस्थितीत सोमवारपूर्वी सर्व जुने करोना मृत्यूंची माहिती समोर आणण्याचे आदेश

आयुक्त इक्बाल सिंग चहेल यांनी दिले. एवढेच नव्हे तर सोमवारनंतर एकही जुना मृत्यू पुढे आल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल, असेही आयुक्त चहेल यांनी स्पष्ट केले. यावेळी रुग्णालयातून दिली जाणारी मृतांची नावे व एपिड सेलमधील नावे यात एकच नाव दोनदा जाणार नाही याची काळजी घेण्यास आयुक्तांनी सांगितले. मुंबईतील २४ वॉर्डमध्ये घरात झालेल्या करोना मृत्यूंची संख्या वॉर्डनिहाय चार- पाच मृत्यूंपेक्षा जास्त नसून रुग्णालयांमधूनच अजूनही मृत्यूंची माहिती योग्य प्रकारे मिळालेली नसल्याचे आजच्या बैठकीत दिसून आल्याचे एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. याबाबत आयुक्त चहेल यांच्याशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र संपर्क होऊ शकला नाही.

मुंबईतील सर्व मृत्यूंची माहिती हाती आल्याशिवाय नेमकी मृत्यूंची कारणमिमांसा करण्यातही अडचणी येत आहेत. तसेच मृत्यूदर कमी करण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांची आखणी करण्याबाबत काही प्रश्न निर्माण होत असल्याकडे अधिकाऱ्यांनी लक्ष वेधले. त्यामुळे सोमवार २९ जूनपर्यंत कोणत्याही परिस्थितीत सर्व करोनामृत्यूंची माहिती समोर आणा अन्यथा कारवाईला तयार राहा असे आयुक्तांनी सांगितले. तसेच त्यानंतर दर ४८ तासात सर्व करोना मृत्यूंची माहिती जमा झालीच पाहिजे असेही आयुक्त चहेल यांनी स्पष्ट केले.