५३० मुंबईकरांना करोनाची बाधा; सात रुग्णांचा मृत्यू

मुंबई : मुंबईमधील रुग्ण दुपटीच्या कालावधीत पुन्हा एकदा सुधारणा होऊ लागली असून रविवारी तो सरासरी ३९२ दिवसांवर पोहोचला. मुंबईत रविवारी ५३० जणांना करोनाची बाधा झाली, तर सात रुग्णांचा मृत्यू झाला.

गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील करोनाबाधित रुग्णांची संख्या नियंत्रणात येऊ लागली आहे. आतापर्यंत तीन लाख दोन हजार ७५३ मुंबईकरांना करोनाची बाधा झाली आहे. विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेणाऱ्या बाधितांपैकी ७१५ रुग्ण रविवारी करोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४ टक्क्यांवर  पोहोचले असून आतापर्यंत दोन लाख ८३ हजार ८५० रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.

विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेले सहा पुरुष आणि एका महिलेचा रविवारी मृत्यू झाला. यापैकी पाच जणांना दीर्घकालीन आजार होते. आतापर्यंत ११ हजार २४२ मुंबईकरांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. विविध रुग्णालयांमध्ये सहा हजार ७७२ करोनाबाधित रुग्ण उपचार घेत आहेत.

मुंबईतील करोना वाढीचा दर ०.२१ टक्क्यावर स्थिर आहे. करोनाबाधित रुग्णांचा शोध घेण्यासाठी आतापर्यंत २५ लाख ९६ हजार ७९० करोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. मुंबईतील प्रतिबंधित क्षेत्राची संख्या १३१ झाली आहे. तर बाधित रुग्ण सापडल्याने दोन हजार ३२६ इमारती टाळेबंद आहेत. गेल्या २४ तासांमध्ये बाधितांच्या संपर्कात आलेल्या अतिजोखमीच्या गटातील दोन हजार ८५१ संशयित रुग्णांचा पालिकेने शोध घेतला असून त्यापैकी ४०१ रुग्णांना करोना काळजी केंद्र-१मध्ये दाखल करण्यात आले आहे. तर उर्वरित संशयित रुग्णांना गृह विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.

राज्यात ३,०८१ नवे रुग्ण

राज्यात गेल्या २४ तासांत ३,०८१ नव्या रुग्णांची नोंद झाली असून, ५० जणांचा करोनामुळे मृत्यू झाला. राज्यात सध्या ५२,६५३ रुग्ण उपचाराधीन आहेत. सर्वाधिक १५,९८६ रुग्ण हे पुणे जिल्ह्य़ात उपचार घेत आहेत. मुंबई ६७७९, ठाणे जिल्हा ९,६२५, नागपूर ४,७४५ रुग्ण उपचाराधीन आहेत. राज्यात आतापर्यंत १९ लाख ९० हजार रुग्ण करोनाबाधित झाले असून, ५०,४३८ जणांचा मृत्यू झाला.  दिवसभरात मुंबई ५३०, पुणे शहर २७१, पिंपरी-चिंचवड १२३, उर्वरित पुणे जिल्हा १०२, नाशिक शहर १६५, नागपूर शहर २६७ नवे रुग्ण आढळले.