आर्थर रोड कारागृहाबरोबर पाठोपाठ भायखळ्यातील महिला कारागृहातही करोनानं शिरकाव केला आहे. कारागृहातील ५४ वर्षीय महिला कैद्याला करोनााचा संसर्ग झाला आहे. ८ मे रोजी या महिलेची पहिली करोना चाचणी करण्यात आली होती. परंतु त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. त्यानंतर पुन्हा करण्यात आलेल्या चाचणीत महिला कैद्याला करोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे.

भायखळा कारागृहातील महिला कैद्याला करोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ८ मे रोजी या महिलेची पहिली करोना चाचणी करण्यात आली होती. त्यानंतर पहिल्या चाचणीचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. त्यानंतर ९ मे रोजी दुसरी चाचणी करण्यात आली. त्याचा रिपोर्ट आला असता, त्यात करोनाची लागण झाली असल्याचं निष्पन्न झालं आहे. त्यानंतर सदर महिलेला सेंट जॉर्ज रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. भायखळा तुरुंग प्रशासनानं याबाबत माहिती दिली आहे.

यापूर्वी मुंबईतील आर्थर रोड कारागृहात १०३ जण करोनाग्रस्त आढळून आले होते. यात ७७ कैद्यांसह २६ पोलिसांचा समावेश होता. “मुंबईतील आर्थर रोड कारागृहात सध्या २८०० कैदी आहेत. कारागृहातील एका बॅरिकमध्ये करोनाचा प्रार्दूभाव झाल्याचं निदर्शनास आलं. त्यानंतर कैदी आणि कर्मचाऱ्यांची तातडीनं तपासणी करण्यात आली. यात ७७ कैदी आणि २६ पोलीस कर्मचाऱ्यांना करोना झाल्याचं निष्पन्न झालं आहे. या १०३ जणांना सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे,” असं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितलं होतं.