मरिन ड्राईव्ह येथे पैसे घेऊन जाणाऱ्या एका कर्मचाऱ्याला चौघांनी रस्त्यात अडवून त्याच्याकडील ५५ लाख रुपये असलेली बॅग लुटून नेली. सोमवारी संध्याकाळी ही घटना घडली.
‘बिल्ड कॉम’ या कंपनीचे मालक अग्रवाल आणि त्यांच्या कार्यालयातील मदतनीस भास्कर मोरे (२९) सोमवारी मरिन ड्राईव्ह येथे आले. अग्रवाल यांनी मोरे याला आपल्याकडील ५५ लाख रुपये असलेली बॅग देऊन ती भुलेश्वर येथील हॉटेलमध्ये पोहोचविण्यास सांगितले होते.
 त्यानंतर अग्रवाल आपल्या गाडीतून निघून गेले. त्यानंतर मोरे बॅग घेऊन जात असताना चौघा अज्ञात इसमांनी त्याला रस्त्यात अडवून त्याच्याकडील बॅग हिसकावून पळ काढला.
 मोरे याने फिर्याद दिल्यानंतर दादासाहेब भडकमकर मार्ग पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणात पोलिसांना फिर्यादीनेच हा बनाव रचल्याचा संशय आहे.
लाचखोर अधिकाऱ्यास अटक
सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्या मुलीस नोकरी लावण्यासाठी दीड लाखाची लाच मागणाऱ्या पालिकेच्या भांडुप येथील प्रशासकीय अधिकारी आणि लिपिकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. मंगळवारी या रकमेतील ४० हजार रुपये घेताना या दोघांना रंगेहाथ अटक करण्यात आली.
घनकचरा व्यवस्थापन विभागातील एका सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्या मुलीने नोकरीसाठी एस वॉर्डात अर्ज केला होता. हा अर्ज पुढे पाठविण्यासाठी प्रशासकीय अधिकारी पिंगळे आणि लिपिक देठे यांनी दीड लाखाची मागणी केली होती. फिर्यादीने २० हजार रुपये देऊनही या दोघांनी फाइल पुढे पाठवली नव्हती. ही फाइल पुढे पाठविण्यासाठी ४० हजार रुपये त्वरित देण्याची मागणी केली. फिर्यादीने याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. त्यानुसार मंगळवारी भांडुपच्या एस वॉर्डमध्ये लावलेल्या सापळ्यात या दोघांना ४० हजार रुपये घेताना रंगेहाथ अटक करण्यात आली.