News Flash

पालघर जिल्ह्य़ात वर्षभरात ५५७ बालमृत्यू

५७ बालकांचे मृत्यू झाले असून जवळपास ३५०० बालके कुपोषित असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.

प्रतिकात्मक छायाचित्र

आरोग्य विभागाचा थंड कारभार; साडेतीन हजार बालके कुपोषित

गेल्या वर्षी पालघर जिल्ह्य़ात झालेले ५६५ बालमृत्यू व कुपोषण आणि त्यानंतर आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांच्या वादग्रस्त विधानानंतर मुख्यमंत्र्यांनी कुपोषण व बालमृत्यूची समस्या सोडविण्यासाठी टास्क फोर्सची घोषणा केली. महिला बालविकासमंत्री पंकजा मुंडे, आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी तात्काळ दौरे करून पदे भरण्यापासून अनेक घोषणाही केल्या, तथापि, अंमलबजावणीच्या नावे बोंब असल्यामुळे यंदाही ५५७ बालकांचे मृत्यू झाले असून जवळपास ३५०० बालके कुपोषित असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.

पालघर जिल्ह्य़ातील मोखाडा, जव्हार, विक्रमगड, वाडा, पालघर, तलासरी, डहाणू आणि वसई येथे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ५५७ बालमृत्यूंची नोंद झाली असून कागदोपत्री मुख्यमंत्र्यांनी आरोग्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या टास्क फोर्सच्या चार बैठका होऊनही ठोस निर्णय व अंमलबजावणी केवळ कागदोपत्रीच राहिल्याचे दिसून येते. गेल्या वर्षी जवळपास सहाशे बालकांचे मृत्यू झाल्याची घटना आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांच्या निदर्शनास आणल्यानंतर ‘बालमृत्यू झाले तर असू दे’ असे वादग्रस्त विधान त्यांनी केल्यामुळे प्रचंड संताप निर्माण झाला होता. सावरा यांनी आपल्या विधानाचा इन्कार केला. त्यापाठोपाठ मुख्यमंत्र्यांनी पालघर जिल्ह्य़ातील कुपोषण व बालमृत्यूप्रकरणी आरोग्य, आदिवासी विकास व महिला बालकल्याण विभागात समन्वय साधण्यासाठी आरोग्यमंत्री दीपक सावंत यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स नेमण्याची घोषणा केली. या टास्क फोर्सने एकूण चार बैठकाही घेतल्या. तथापि, अद्याप त्यांचा अंतिम कृती आराखडा तयार झाला नसल्याचे आरोग्य विभागाच्या सूत्रांनी सांगितले. पालघर जिल्ह्य़ात जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या चार पदांपैकी तीन पदेच गेल्या वर्षभरात भरण्यात आली नाहीत. बालरोगतज्ज्ञांच्या नियुक्तीच्या घोषणा झाल्या, परंतु गेल्या वर्षभरात एकाही बालरोगतज्ज्ञाची नियुक्ती होऊ शकलेली नाही तर वैद्यकीय अधिकाऱ्यांची तब्बल २७ पदे रिक्त असल्यामुळे उपचारात अनंत अडचणी येत असल्याचे येथील डॉक्टरांचेच म्हणणे आहे.

प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांमध्ये पुरेशा सुविधा नाहीत. वैद्यकीय अधिकाऱ्यांना पाडय़ापाडय़ात जाऊन सर्वेक्षण करण्यासाठी पुरेशी वाहने नाहीत. गेल्या वर्षी बालमृत्यू व कुपोषण उघडकीस आल्यानंतर सप्टेंबरमध्ये शून्य ते ५ वर्षे वयोगटाच्या मुलांचे पुन्हा सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले होते. भरारी पथकांची संख्या वाढविण्याची गरज असताना चार दिवसांपूर्वी आरोग्यमंत्र्यांनी घेतलेल्या आढाव्यात पुन्हा डॉक्टरांच्या नियुक्तीचे तसेच १८ नवीन भरारी पथके नेमण्याचे आदेश देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. गेल्या वर्षी एवढे बालमृत्यू होऊनही आरोग्य मंत्रालयाने आजपर्यंत रिक्त पदे का भरली नाहीत असा सवाल ‘मॅग्मो’ संघटनेच्या डॉक्टरांनी केला आहे.

तीव्र कुपोषित बालकांची संख्या ६०३

‘आयसीडीएस’च्या अहवालानुसार यंदा तीव्र कुपोषित बालकांची संख्या ६०३ एवढी असून ३३६२ कुपोषित बालकांची नोंद करण्यात आली आहे. यंदा मोखाडय़ात ५६ बालमृत्यू झाले असून जव्हारमध्ये १४१, विक्रमगड येथे ५४, वाडा ५१, पालघर ५३, तलासरी ३१, डहाणू १४९ आणि वसईमध्ये २१ बालमृत्यू झाले आहेत. गेल्या वर्षी बालमृत्यू व कुपोषणाची भीषण परिस्थिती उघडकीस आल्यानंतरही टास्क फोर्सचे काम कागदोपत्री व बैठका घेण्यापुरतेच असल्याचे आरोग्य विभागातील डॉक्टरांचे म्हणणे असून आरोग्य मंत्रालयात जाऊन याबाबत माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता कोणतीही माहिती मिळू शकली नाही. त्याचप्रमाणे आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव विजय सतबीर सिंग यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क होऊ शकला नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 17, 2017 4:27 am

Web Title: 557 child deaths in palghar district in last one year
Next Stories
1 ‘हिलरीच्या नृत्या’चे खोटे वर्तमान!
2 घाटकोपरजवळ लोकल ट्रेनच्या मालडब्यात आग, प्रवासी सुखरुप
3 मुंबई विमानतळाच्या इमारतीमध्ये लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश
Just Now!
X